अकोला: आज जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे वाढलेले आहेत, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. या वेळी सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे, पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे अपघात घडल्याचा दुदैर्वी घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत ग्राहकांनी सूचनांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे.विजांचा कडकडाट होत असलेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा, कारण अनावधाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दुरचित्रवाणीची डिश किंवा अन्टेना विजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करतांना मेन स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषता: मिटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत व विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नये. वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.येथे नोंदवा तक्रारग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेळेत व्हावे, यासाठी २४/७ ग्राहक सुविधा केंद्र आहे. ग्राहकाने त्यांच्या मोबाईल किंवा घरातील इतर फोन द्वारे १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ वा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.पावसाळ्यात विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या घटना पाहता अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे आहे. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहावे.- विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, अकोला.