जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास मनाइ! दुष्काळसदृश परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: February 16, 2024 09:43 PM2024-02-16T21:43:31+5:302024-02-16T21:44:11+5:30
गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हयात यापूर्वीच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
अकोला : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई भासू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातून चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी दिला.
गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हयात यापूर्वीच दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुषंगाने दुष्काळसदृश परिस्थितीत उन्हाळ्यात जिल्हयात चारा टंचाइचा प्रश्न निर्माण होवू नये आणि जिल्हयातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असावा, यासाठी जिल्हयातील उपलब्ध चाऱ्याची जिल्हयाबाहेर वाहतूक करण्यास मनाइ करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत केला. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश अंमलात राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ९.५५ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध!
मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात ९ लाख ५५ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणल्यास भविष्यात चारा टंचाई भासणार नाही, असा अभिप्राय पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिला. त्यानुसार जिल्हयातून जिल्हयाबाहेर चारा वाहतुकीस मनाइ करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.