वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:28 PM2020-03-11T12:28:46+5:302020-03-11T12:28:55+5:30
एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असल्याने प्रादेशिक वन विभागाने जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून जंगलात वणवा लागला तरी त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी ही जागृती महत्त्वाची ठरत आहे.
क्षेत्र पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात येत असून, त्यानंतर अकोट तालुक्यातही बराच भाग जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात आहे. या जंगलांमध्ये आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यापासून वन्य जीवांना मोठा धोका दरवर्षीय असतो. यासोबतच वणव्यामुळे प्रदूषणातही वाढ होत असल्याने झाडांचे मोठे नुकसान होते. हे रोखण्यासाठीच प्रादेशिक वन विभागाने आता कंबर कसली असून, एक विशेष पथक आणि विशेष व्हॅनद्वारे वणवा प्रभावित क्षेत्र तसेच गावांमध्ये या पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यामुळे कोणत्याही जंगलात आग लागल्यास त्याची माहिती तातडीने मिळून लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.
पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जागृती
पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या ठिकाणावरील गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे या जंगल क्षेत्रात आग लागल्यास ग्रामस्थांकडून तातडीने माहिती पोहोचविण्यात येते. यावरून आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास वन विभागाला मदत होत असल्याने जंगल क्षेत्रातील गावांमध्ये सुरू असलेली जनजागृती वणवा रोखण्यासाठी मोलाची ठरत आहे.
प्रदूषण रोखण्याचे मोठे प्रयत्न
जंगलात लागणाºया मोठ्या प्रमाणातील वणव्यांमुळे वन्य जीवाला झळ पोहोचण्याचा मोठा धोका आहे. याचेच परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून भोगावे लागणार आहे. त्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवून प्रदूषण होणार नाही, याची पूर्णत: खबरदारी प्रादेशिक वन विभागाकडून घेण्यात येत आहे. वन विभागाच्या या विशेष आणि अनोख्या उपक्रमामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.
जंगलातील वणवा ज्यांच्यामुळे लागतो, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी एक विशेष पथक आणि व्हॅन तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वणवा प्रभावित भागामध्ये रोजच जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांमध्ये आता जागृती येत असून, वणवा रोखण्यासाठी या ग्रामस्थांनीच आता मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वन विभागाचे प्रयत्न फळाला येत असल्याचे वास्तव आहे.
- विजय माने,
उपवनसंरक्षक,
प्रादेशिक वन विभाग, अकोला.