वाहाळा बु : पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी बाळासाहेब देशमुख यांनी त्यांच्या चार एकर शेतात काही दिवसांपूर्वीच कपाशीची लागवड केली होती. परंतु कपाशीवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतातील संपूर्ण कपाशीचे पीक जळून गेले आहे. यामुळे शेतकरी देशमुख हतबल झाले असून, ३० हजार रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
शेतकरी बाळासाहेब देशमुख यांनी कर्ज काढून १ मे रोजी चार एकर शेतामध्ये कपाशी लागवड केली होती. त्यांना चार एकर शेतामध्ये कपाशी लागवड करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च आला. त्यानंतर कपाशी चांगल्या प्रमाणात निघाली होती; परंतु अचानक अज्ञात रोगामुळे कपाशी जळून खाक झाल्याने हातचे पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशी लागवड करून त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून आपला दैनंदिन खर्च वर्षभर भागवितात. मात्र यंदा कपाशीवर अज्ञात रोगाने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकऱ्याच्या कपाशी पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो: