चार महिन्यांचे वेतन थकले, शिक्षक संतप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 PM2020-06-06T17:00:42+5:302020-06-06T17:01:08+5:30
शिक्षकांनी सातत्याने संस्थाचालकाकडे तगादा लावल्यानंतरही शिक्षण संस्थाचालकाने शिक्षकांना वेतन दिले नाही.
अकोला: जूना आरटीओ रोडवर असलेल्या एका खासगी कॉन्व्हेंटमधील ११ शिक्षक चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. शिक्षकांनी सातत्याने संस्थाचालकाकडे तगादा लावल्यानंतरही शिक्षण संस्थाचालकाने शिक्षकांना वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी शनिवारी संस्थाचालकास चांगलेच धारेवर धरले.
तुकाराम चौकातील जूना आरटीओ रोडवर एक इंग्रजी माध्यमाची कॉन्व्हेंट आहे. या कॉन्व्हेंटमधील शिक्षकांना कोरोनाचे कारण दाखवून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. उद्योगधंदे, बंद आहेत. त्यामुळे अशातच खासगी शाळांसमोर सुद्धा आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. विदद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्काची रक्कम थकली आहे. त्यामुळे अनेक शाळांनी शिक्षकांना वेतन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. या शाळेमधील ११ शिक्षकांना डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंतचे वेतन देण्यात आलेले नाही. कोरोनामुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यात संस्थेने वेतन दिले नाही. त्यामुळे शाळांमधील शिक्षक, शिक्षिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार महिन्यांपासून वेतन नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा. असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. शिक्षकांनी संस्थाचालकाकडे सातत्याने वेतनासाठी तगादा लावला. परंतु संस्थाचालकाने वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांना शनिवारी शाळेत धाव घेऊन संस्थाचालकास चांगलेच धारेवर धरले. अखेर काही दिवसांमध्ये वेतन देण्याचे आश्वासन संस्थाचालकाने दिले आहे. वेतनदिले नाहीतर शिक्षक कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहेत. (प्रतिनिधी)