अकोला जिल्ह्यात आणखी चौघांचा बळी, ३४ पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:07 PM2020-12-19T18:07:20+5:302020-12-19T18:07:56+5:30
CoronaVirus in Akola चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३१० झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख पुन्हा वाढत असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, १९ डिसेंबर रोजी जिल्ह्यात आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३१० झाली आहे. आणखी ३४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १०११६ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ५८१ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ३४ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ५४७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, केडीया प्लॉट, जवाहर नगर व राम नगर येथील प्रत्येकी दोन, तर मालेगाव, सिंधी कॅम्प, दिपक चौक, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट, मलकापूर, जठारपेठ, गोरक्षण रोड, चोहट्टा बाजार, खेडकर नगर, दहीहंडा ता. अकोट, राधाकिशन प्लॉट, मेहरबानू कॉलेज, एचडीओ ऑफिस, कृषी नगर, जुने राधाकिशन प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा, वाशिम बायपास, केळकर हॉस्पिटल व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
एक महिला, तीन पुरुषांचा मृत्यू
शनिवारी चौघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. मुर्तीजापूर तालुक्यातील पारद येथील ६५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ८२ वर्षीय पुरुष आणि नायगाव येथील ५४ वर्षीय पुरुष अशा तिघांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीघांना अनुक्रमे १७ डिसेंबर, ९ डिसेंबर व ८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. किर्ती नगर, गोरक्षण रोड भागातील ७२ वर्षीय महिलेचा शुक्रवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना १२ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
७५६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०११६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७५६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
१४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.