सुपर स्पेशालिटीतील पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:37 PM2019-12-07T14:37:50+5:302019-12-07T14:38:19+5:30
पॅरामेडिकलचे चारही विभाग रद्द करून रुग्णांच्या महत्त्वाच्या चाचण्या सर्वोपचार रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक प्रबळ होणार असल्याने अकोलेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आतुरतेने वाट पाहत आहेत; पण अपुरे मनुष्यबळ अन् पॅरामेडिकलमधील चार विभाग रद्द करण्यात आल्याने महत्त्वाच्या चाचण्यांचा भार सर्वोपचार रुग्णालयातील २३ तंत्रज्ञांवर येणार आहे. तोकड्या मनुष्यबळावर कारभार चालवणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयावर सुपर स्पेशालिटीचाही भार येणार असल्याने रुग्णसेवा आणखी विस्कळीत होणार आहे.
विविध असाध्य आजारांवर अकोल्यातच उपचार व्हावा म्हणून येथे ४८० खाटांची क्षमता असणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक प्रबळ होणार, अशी आपेक्षा वर्तविण्यात येत होती; परंतु संचालकांनी सुपर स्पेशालिटीसाठी केवळ ४६७ पदांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शिवाय, प्रस्तावित पॅरामेडिकलचे चारही विभाग रद्द करून रुग्णांच्या महत्त्वाच्या चाचण्या सर्वोपचार रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुपरस्पेशालिटीचा मोठा भार सर्वोपचार रुग्णालयावर पडणार आहे. एकीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात अपुºया मनुष्यबळामुळे रुग्णसेवा प्रभावित असताना, हा कारभार कसा चालणार, अशी चिंता अधिकाऱ्यांना भेडसावत आहे. तोकड्या मनुष्यबळाचा विचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यासाठी १ हजार ८६ पदांचा आकृतिबंद संचालकांकडे पाठविला होता; मात्र यातील निम्म्याहून कमी पदांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा ताण वाढला आहे.
पॅथोलॉजीच विद्यार्थ्यांची प्रयोगशाळा
सर्वोपचार रुग्णालयात दोन पॅथोलॉजी असून, वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रयोग शाळा आहे; मात्र अपुºया मनुष्यबळामुळे महाविद्यालयातील प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ सर्वोपचार रुग्णालयातील पॅथोलॉजीमध्ये रुग्णसेवा देत आहेत. याच ठिकाणी विद्यार्थ्यांनाचेही प्रात्यक्षिके होत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रद्द करण्यात आलेल्या पॅथोलॉजी, बायोकेमिस्ट्री, सूक्ष्म जीवशास्त्र, अॅन्टोमॉलॉजी या चार तपासणी विभागाचा भार सर्वोपचार रुग्णालयावर येणार आहे. या विभागात प्रत्येकी एक युनिट असून, प्राध्यापक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक असे मनुष्यबळ आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १ हजार ८६ पदांचा आकृतिबंद संचालकांकडे पाठविण्यात आला होता; परंतु यातील ४६७ पदांचाच प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. तसेच पॅरामेडिकलचे चार विभाग जीएमसीमधूनच चालविण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञांची मागणी केली आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला