खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:09+5:302021-09-24T04:22:09+5:30
अकोला : खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकवेळ वापरलेले तेल पुन्हा वापरू नये, असा दंडक असताना हॉटेल, किरकोळ खाद्य विक्रेते सर्रास तेलाचा ...
अकोला : खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकवेळ वापरलेले तेल पुन्हा वापरू नये, असा दंडक असताना हॉटेल, किरकोळ खाद्य विक्रेते सर्रास तेलाचा पुनर्वापर तळण्यासाठी करतात. वारंवार गरम केल्याने तेलामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ट्रान्सफॅट निर्माण होते. कार्सिनोजेनिक या कर्करोगाला कारणीभूत घटकाचीही निर्मिती वारंवर वापरणाऱ्या तेलात होऊ शकते. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यास त्याचा अनिष्ट परिणाम शरीरावर होतो. कर्करोग, हृदयरोग, पक्षाघातसारखे दुर्धर आजार जडण्याची दाट शक्यता असते. याशिवाय अल्झायमर, मुलांमध्ये स्थूलपणा वाढीस लागणे, पचनक्रिया मंदावणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे पुनर्वापर होणाऱ्या तेलातील पदार्थ खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. खाद्यतेलाचा वारंवार वापर करण्यापासून रोखण्यासाठी कारवाईची तरतूद आहे; परंतु अशी प्रकरणे समोरच येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. तेलाचा पुनर्वापर करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारे अनेक जण कायद्याच्या कचाट्यात सापडतच नाहीत.
तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक
वारंवार वापरलेल्या तेलात ट्रान्सफॅट निर्माण होते. हे फॅट आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक ठरते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. शिवाय उच्च रक्तदाब, पक्षाघात, कर्करोग, मूत्रपिंडाचे विकारही जडू शकतात. पचन क्रियेवर परिणाम होऊन, एकूण पचनयंत्रणाच ठप्प होण्याची शक्यता असते.
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
रस्त्यावरील विक्रेत्यांकडचे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. समोसे, कचोरी, खस्ता यासारखे पदार्थ तळण्यासाठी हे विक्रेते एकाचा तेलाचा वारंवार वापर करतात. हे पदार्थ चविष्ट असले, तरी ते आरोग्याची अपरिमित हानी करणारे असतात.
रोगांना आमंत्रण देऊ नका
वारंवार वापरलेल्या तेलामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान होते. हृदयविकार, पक्षाघात, पोटाचे विकार होऊ शकतात. विविध रोगांना आमंत्रण द्यायचे नसेल, तर पुनर्वापर होणाऱ्या तेलात तळलेले पदार्थ टाळलेलेच बरे.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, मेडिसिन विभागप्रमुख, जीएमसी, अकोला
...तर होऊ शकते दंडात्मक कारवाई
तळण्यासाठी तेलाचा वापर तीनपेक्षा जास्त वेळ करू नये. २५ पीपीसीपेक्षा जास्त घनतेचे तेल आरोग्यास हानिकारक आहे. व्यावसायिकांनी अशा तेलाचा वापर न करता ते बायोडिझेलसाठी द्यावे, अशा सूचना आहेत. याचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
- रावसाहेब वाकडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला
अहो, आश्चर्यम एकावरही कारवाई नाही
तेलाचा वारंवार पुनर्वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असली, तरी जिल्ह्यात एकावरही कारवाई झाल्याची नोंद नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते. अलीकडेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.