२१ पीएचसीमध्ये मिळणार पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:54 PM2019-07-10T13:54:21+5:302019-07-10T13:55:15+5:30
जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- प्रवीण खेते
अकोला: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे; मात्र लवकरच थेट मुलाखतीद्वारे ही रिक्त पदे भरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे.
सध्या पावसाळ््याचे दिवस असून, जिल्ह्यात साथरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. साथ रोगावर नियंत्रणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे विशेष मोहीम राबविली जात आहे; परंतु जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६२ पैकी २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला ही विशेष मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय, अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावांमध्येही ग्रामस्थांना आरोग्याची चिंता सतावत आहे; मात्र ही चिंता आता लवकरच दूर होणार असून, जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही पदभरती थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, १५ जुलै रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.
या ‘पीएचसी’चा समावेश
आपातापा, कुरणखेड, कापशी, आलेगाव, महान, पिंजर, वाडेगाव, पंजगव्हाण, हातरुण, पारस, कुरूम यासह जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
बीएएमएस डॉक्टरांना संधी
या पदभरती अंतर्गत बीएएमएस डॉक्टरांना संधी मिळणार असून, त्यांना दुपटीने मानधन वाढीचाही लाभ मिळणार आहे. ‘समान काम समान वेतन’ या धोरणांतर्गत त्यांना वेतन मिळणार असल्याने रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होईल.
जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी बीएएमएस डॉक्टरांची भरती प्रक्रिया १५ जुलै रोजी राबविण्यात येणार आहे. या पदभरतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आणखी बळकट होण्यास मदत होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.