श्रीराम मंदीरासाठी विदर्भातील १२,५०० गावांमधून निधी संकलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 07:19 PM2021-01-10T19:19:14+5:302021-01-10T19:20:58+5:30
Shri Ram Temple श्रीराम मंदीरासाठी विदर्भातील १२,५०० गावांमधून निधी संकलन करणार असल्याची माहिती गोविंद शेंडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अकोला : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर भगवान श्रीरामचे मंदीर उभारण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, यासाठी देशभर निधी संकलन अभियान सुरु करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून विदर्भात १५ जानेवारपासून निधी संकलन अभियानाची सुरुवात होणार असून, तब्बल १२,५०० गावांमध्ये जाऊन निधी संकलीत करण्यात येणार असल्याची माहिती, श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र निधि संकलन आणि एवं गृह सम्पर्क अभियानाचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अभियानाबाबत अधिक माहीत देताना शेंडे म्हणाले, की संपूर्ण देशातून निधी संकलीत करण्यासाठी चार लाख गावांमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जवळपास १६ कोटी कुटुंबाशी संपर्क साधण्यात येणार आहे. विदर्भातही १२,५०० गावांमधील कुटुंबांपर्यंत पोहचण्यासाठी १५ जानेवारीपासून अभियानाची सुरुवात होणार आहे, असे शेंडे यांनी सांगितले. तब्बल १०८ एकर क्षेत्रावर होणार असलेल्या मंदिरासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. निर्माणकार्य सुरु झाल्यापासून अंदाजे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास जाईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अकोला विभागाचे संघ चालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्रांत कोषाध्यक्ष राहुल राठी, प्रांत सेवा प्रमुख गणेश कालकर, विश्व हिंदू परिषदचे जिलाध्यक्ष प्रकाश लोढ़िया, बजरंग दल विभाग संयोजक सूरज भगेवार उपस्थित होते.