गायगाव सरपंचाचे पद धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:24+5:302021-06-16T04:26:24+5:30
येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. दरम्यान, ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचपदी दीपमाला वानखडे यांची ६ विरुद्ध ...
येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. दरम्यान, ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचपदी दीपमाला वानखडे यांची ६ विरुद्ध ५ अशी निवड झाली होती. या दरम्यान येथील ग्रामपंचायत सदस्य स्वराज दिलीप थोटे यांनी १० मार्च २०२१ रोजी सरपंच दीपमाला वानखडे यांच्याविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सरपंच पतीच्या नावावर गावातच मालमत्ता क्रमांक ६५१ ,१२०० चौ फूट मालमत्ता असून, याची खरेदी त्यांनी २५ ऑगस्ट २०१५ रोजी केली असून, त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये न करता, ती मालमत्ता लपवून ठेवली. ग्रामपंचायत निवडणुकीतही दीपमाला वानखडे यांनी अर्जात त्याचा उल्लेख केला नाही. तसेच खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून निवडणूक आयोग व शासनाची फसवणूक केली. त्यामुळे त्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे दोन्ही पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, या वादग्रस्त मालमतेची नोंद २३ एप्रिल २०२१ रोजी ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने हे प्रकरण तालुका निवडणूक अधिकारी बाळापूर यांच्याकडे निर्णयासाठी पाठविले असून, या प्रकरणाची अंतिम व महत्त्वपूर्ण सुनावणी १७ जूनला तहसीलदार डी. एल. मुकुंदे यांच्या दालनात होणार आहे.
गायगाव सरपंचाविरुद्ध आलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून, यासंदर्भात शासन नियम व वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय १७ जूनला घेऊन, तसा अहवाल वरिष्ठांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
-डी. एल. मुकुंदे, तहसीलदार बाळापूर
सरपंच पती यांनी २०१५ रोजी घेतलेल्या मालमतेची नोंद तत्काळ करून ग्रामपंचायतीमध्ये कराचा भरणा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी मालमत्तेची नोंद २३ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आली आहे.
-एस. एस. धुळे, ग्रामविकास अधिकारी