अकोला : अकोला जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला खदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. या चोरट्यांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आणखी काही दुचाकी त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अकोला शहरासह तालुक्याच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आलेले आहेत. खदान पोलीस ठाण्यात दाखल एका दुचाकी चोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता बुलढाणा जिल्ह्यातील सराईत चोरट्यांच्या टोळीने ही दुचाकी चोरल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून खदान पोलिसांनी शुभम मुळे, राहुल देशमुख, अक्षय सातपुते, राजेश सिंग ठाकूर व कृष्णा वाडेकर या पाच जणांना ताब्यात घेतले. या पाचही दुचाकी चोरट्यांची कसून चौकशी केली असता या चोरट्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर या पाचही चोरट्यांकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या चोरट्यांनी अकोला शहरातून तीन दुचाकी चोरल्याची माहिती असून इतर चार दुचाकी या बुलढाणा तसेच वाशिम जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास पोलिसांना आहे.