- अतुल जयस्वालअकोला : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा किंवा त्यांच्या नावाने एखादे नगर नाही, असे एकही शहर भारतात सापडणार नाही; परंतु एखाद्या गावालाच गांधीजींचे नाव असणारे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे बहुधा एकमेव गाव असावे. महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले. गांधीजींचे स्मारक म्हणून या गावात त्यांचा संगमरवरी दगडाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला असून, असा पुतळाही विरळाच आहे. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिमाखदारपणे उभे असलेले हे स्मारक अकोट-अकोला मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या अस्थी देशात विविध ठिकाणच्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांनी गांधीजींच्या अस्थी अकोल्यापासून १८ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाघोली गावातून वाहणाºया पूर्णा नदीत विसर्जित करण्यासाठी आणल्या होत्या. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीजींच्या अस्थी पूर्णा नदीत प्रवाहित करण्यात आल्या. त्यावेळी या ठिकाणी मोठा समुदाय जमला होता, असे जुने ग्रामस्थ सांगतात. ब्रजलाल बियाणी यांनी त्यावेळी गावकºयांसोबत चर्चा करून गांधीजींचे मोठे स्मारक बांधण्याचे ठरविले. स्मारक बांधण्याचे निश्चित झाल्यानंतर सेठ खुशालसिंग मोहता यांनी गावातील ८ एकर जमीन उपलब्ध करून दिली, तर गोपालदास मोहता यांनी ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली, तसेच तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताकडून १ लाख १० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. शंभर चौरस फूट चौथºयावर भव्य घुमटाकार मंदिर उभारून त्यामध्ये ७ फूट उंचीचा संगमरवरी दगडातून साकारलेला महात्मा गांधींचा कोरीव पुतळा स्थानापन्न करण्यात आला. २ आॅक्टोबर १९४८ रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. गांधीजींचे मोठे स्मारक झाल्यापासून वाघोली हे गाव गांधीग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले.गांधीजींचा संगमरवरी दगडाचा देशातील दुसरा पुतळामहात्मा गांधी यांचे पुतळे प्रत्येक शहरात पहावयास मिळतात; परंतु पूर्णाकृती संगमरवरी दगडात साकारण्यात आलेला गांधीजींचा पुतळा गुजरात राज्यातील दांडीनंतर अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथेच असल्याचा दावा करण्यात येतो.महात्मा गांधी विद्यालय आले नावारूपासस्मारक उभारल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला निवासी व रात्र शाळा सुरू करण्यात आली. त्यावेळी रोवलेल्या या शाळारुपी बिजाचे रूपांतर कालांतराने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विशाल वटवृक्षात झाले. बारावीपर्यंत अभ्यासक्रम असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालयात परिसरातील गावांमधील शेकडो विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. महात्मा गांधींची जयंती व पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
पूर्णेत झाले होते गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन; वाघोली बनले गांधीग्राम!
By atul.jaiswal | Published: October 02, 2019 11:54 AM
महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले.
ठळक मुद्दे१२ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीजींच्या अस्थी पूर्णा नदीत प्रवाहित करण्यात आल्या.७ फूट उंचीचा संगमरवरी दगडातून साकारलेला महात्मा गांधींचा कोरीव पुतळा स्थानापन्न करण्यात आला. दिमाखदारपणे उभे असलेले हे स्मारक अकोट-अकोला मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.