आत्महत्येची भीती दाखवून मुलीला नेले पळवून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:13 PM2019-08-01T14:13:46+5:302019-08-01T14:13:51+5:30
अकोला : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत चल, नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करून तुलाही मारतो, असे म्हणून युवकाने बीकॉम ...
अकोला : ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत चल, नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करून तुलाही मारतो, असे म्हणून युवकाने बीकॉम द्वितीय वर्षाला असलेल्या एका १९ वर्षीय युवतीला पळवून नेले. नागपूर रेल्वेस्थानकावर संधी मिळताच युवतीने तिच्या काकाला फोन करून हा प्रकार सांगितला. काका तेथे आल्यावर युवती काकासोबत निघून आली आणि युवक पळून गेला. युवतीच्या या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बीकॉमच्या द्वितीय वर्षाला शिकणारी १९ वर्षीय युवती ही २५ जुलै रोजी बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ एका टायपिंग इन्स्टिट्युटमध्ये गेली होती. तेथे आरोपी धनंजय दिलीप देशमुख (वय २२) आला. त्याने युवतीला तुझ्याशी बोलायचे आहे, सोबत चल, असे म्हणून तिला जबरदस्ती आॅटोत बसविले. त्यानंतर तो तिला रेल्वेस्थानकावर घेऊन गेला. तेथे त्याने लग्नाची गळ घातली.युवतीने नकार दिला असता, त्याने तिला जीवे मारून टाकण्याची व स्वत: जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. घाबरलेली युवती त्याच्यासोबत रेल्वेत बसून नागपूरला गेली. नागपूर रेल्वेस्थानकावर संधी मिळताच युवतीने तिच्या नागपूर येथील काकाला फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे काका तत्काळ रेल्वेस्थानकावर पोहोचले. ते आल्याचे पाहून युवक गायब झाला. त्यानंतर युवतीच्या काकांनी भावाला घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर ते नागपूर येथे गेले व युवतीला अकोल्यात आणले. त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धनंजय दिलीप देशमुख (रा. उमरी) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.