अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवार २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी घसरला असून यंदाचा निकाल ९३.६२ टक्के लागला आहे. दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींचाच बोलबाला दिसून आला. मुलांच्या निकालाच्या तुलनेत मुलींचा निकाल सरस ठरला असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी तब्बल ९५.८६ आहे.
दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३५९ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १८१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गतवर्षी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आल्यामुळे अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांचा नेत्रदीपक असा निकाल लागला होता. यंदा मात्र बोर्डाने निकाल घोषीत केल्यामुळे तब्बल चार टक्क्यांनी निकाल घसरला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मुलांचा निकाल केवळ ९०.५५ टक्के तर मुलींचा निकाल ९५.८६ टक्के लागला आहे. २५ हजार १०७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २३ हजार ३६७ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार २२२ मुलांपैकी ११ हजार ९७३ मुले उत्तीर्ण झाले तर ११ हजार ८८५ मुलींपैकी ११ हजार ३९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
तब्बल १७४० विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. २ जून सकाळपासून दहावीच्या निकालाची विद्यार्थी व पालकांना प्रतीक्षा होती. एकंदरीतच निकालाचे चित्र समाधानकारक आहे.