अकोला:महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा आॅनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा आॅनलाईन करीत आहेत. आॅनलाईन ग्राहकांना कागदी वीज बिल गरजेचे नसल्यामुळे पर्यावरणप्रेमी ग्राहक कागद वाचवून ‘गो ग्रीन’चा पर्याय वापरून एसएमएस, ई-मेल आणि अॅपवर वीज बिल प्राप्त करून वीज देयकात १० रुपयाची सूट मिळवीत आहेत. यामध्ये अकोला परिमंडलातील २ हजार ५०० ग्राहकांचा समावेश आहे.ही सेवा महावितरणच्या संकेतस्थळावर तथा अॅपवर नोंदणीकृत ग्राहकांसाठी आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने महावितरणच्या या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर ग्राहक नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा. यामध्ये ईमेल व मोबाईल क्रमाक व इतर माहिती नोंदवून घ्यावी, वीज देयक ईझ्रमेल वर मिळावे ही माहिती नोंद करावी. संकेतस्थळावर ‘गो ग्रीन’ येथे क्लिक केल्यानंतर यामध्ये ग्राहक क्रमाक व बिलीग युनिटची माहिती दयावयाची आहे.त्यानंतर तुमच्या चालू महिन्यातील वीज बिलावरील सर्वात वर असलेल्या डाव्या बाजूला असलेल्या गो ग्रीन नंबर क्रमाक नोंद केल्यानंतर महावितरण कडून नोंदणी असलेल्या ई-मेल वर पुष्टी करण्यासाठी लिंक पाठविली जाईल. ग्राहकाने सदर पुष्टी केल्यानंतर गो -ग्रीनची नोदणी पूर्ण होईल. याचप्रमाणे महावितरणच्या अॅपवर सुद्धा सहज व सोप्या पद्धतीने नोंदणी करता येईल. त्यानंतर पुढील महिन्याला वीज देयकाची कागदी प्रत मिळणे बंद होईल व नोंदनीकृत ई-मेल वर वीजदेयक मिळेल व १० रुपयांची सूट मिळण्यास सुरुवात होईल. मोबाईल क्रमाकाची नोदणी असल्यामुळे सोबतच मोबाईलवर सुद्धा एसएमएस द्वारे देयकाची माहिती मिळेल. ही सेवा ग्राहक कधीही बंद करू शकतात.कागदी वीज बिल मिळत नसले तरी ग्राहकांना मागील वीज देयके पाहण्याची सुविधा महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर सुद्धा उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी या पर्यावरणपुरक सेवेचा वापर आणि देयकात रक्कम सुटीचा व बचतीचा लाभ घ्यावा. - अनिल डोये, मुख्य अभियंता, महावितरण,अकोला परिमंडळ.