शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:54 PM2020-04-08T17:54:03+5:302020-04-08T17:54:10+5:30
नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे.
अकोला: कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत आहे. अकोल्यात आतापर्यंत दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असे असतानाही नागरिक फारसे गंभीर दिसत नाहीत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे. विशेष वेशभुषा करून हा युवक शहरातील गर्दीच्या ठिकाणी फिरून मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचे आवाहन करताना दिसत आहे.
रामदासपेठेत राहणारे प्रकाश बागडे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील ट्रेसरीमध्ये कर्मचारी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून येत असल्यानंतरही नागरिक त्याविषयी गंभीर दिसत नाहीत. भाजीपाला खरेदी करताना, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रकाश बागडे स्वत:चा जीव धोक्यात घालून जनजागृती करीत आहेत. बुधवारी त्यांनी जठारपेठेतील दिवेकर चौक, सातव चौकामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा आणि गरज असेल तर घराबाहेर पडा. घराबाहेर निघणे टाळा, असे आवाहन प्रकाश बागडे करीत आहेत. जीवतोडून लोकांना ते समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत.