विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन
By रवी दामोदर | Published: January 8, 2024 05:07 PM2024-01-08T17:07:47+5:302024-01-08T17:08:41+5:30
पहिल्याच दिवशी ९ शाळांनी सादर केली नाटिका; प्रक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
रवी दामोदर, अकोला : स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव- २०२३ चे उद्घाटन सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी थाटात पार पडले. महोत्सव तीन दिवस चालणार असून, सोमवारी पहिल्याच दिवशी ९ शाळांनी नाटिका सादर केली. या महोत्सवाला २८ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. पहिल्याच दिवशी महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला असून, गतवर्षाचे उत्कृष्ट बाल कलाकार अदिती वानखडे, खंडेलवाल स्कूलचा विद्यार्थी श्रेयश इंगळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले, हे विशेष.
उद्घाटनाच्या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, विश्वास करंडक आयोजन समितीचे प्रमुख प्रा. मधु जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. पहिले नाटक मागील वर्षाचा विजेता संघ खंडेलवाल स्कूलने ‘नाटकाचे झाले नाटक’ हे नाटक सादर केले. नाट्य परीक्षक म्हणून पुणे येथून धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे हे गेल्या पाच वर्षापासून सहभाग नोंदवित आहेत. डॉ. सुचिता पाटेकर यांनी शालेय प्रक्रियेत नाटकाचे महत्त्व विषद करताना शालेय शिक्षण विभाग अशा सर्व चांगल्या व अभिव्यक्त होण्यास मदत करणाऱ्या कार्यक्रमास भविष्यात सुद्धा हातभार लावेल, असे मत व्यक्त केले.
आज सादर झालेले नाटक :
महोत्सवात खंडेलवाल इंग्लिश स्कूल जुने शहर या शाळेने ‘नाटकाचे नाव नाटक’, उत्तमचंद राजेश्वर इंग्लिश प्राइमरी स्कूलने ‘जंग ए फुड’, स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणा रोड कौलखेड या शाळेने ‘गणपती बाप्पा हाजीर हो’, स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणा रोड ‘शॉर्टकट’, ज्ञानदर्पण इंग्रजी प्राथमिक शाळेने ‘आधुनिक ध्रुव’, जुबली इंग्लिश हायस्कूलने ‘कोवळे अंकुर’, सुप्पा इंग्रजी प्राथमिक शाळेने ‘परोपकारी निसर्ग’ व अमृत कलश विद्यालय कौलखेड या शाळेने ‘भित्रा राजपुत्र’ हे नाटक सादर केले.