लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडगाव येथून गुटख्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणावरून तब्बल २ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.अकोट उपविभागातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या अवैध धंदे तसेच प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने अडगाव येथे सापळा रचून अक्रम खा हशमत खा याच्या घरी छापा टाकून तब्बल २ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. यामध्ये हॉट प्रीमियम पानमसाला १० हजार रुपयांचा, ७३ हजार रुपयांचा वाह पान मसाला, ४३ हजार रुपयांचा विमल पान मसाला, ७ हजार रुपयांचे तंबाखू पाकीट, १ हजार रुपयांचा पान बहार, दबंग तीन गुटखा २ हजार यासह तब्बल २ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा साठा या आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आला. त्यानंतर अक्रम खा हशमत खा रा. अडगाव याच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.
अडगावातून २ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:50 AM