सचिन राऊत/ अकोलाबड्या गुटखा माफियांच्या गोदामातील गुटखा पानटपर्यांवर पोहोचविण्यासाठी फेरीवाले दुचाकी आणि ओमनी कारद्वारे पोलिसांच्या नाकावर टिच्चून दिवसभर गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुटखा माफियांवर पोलिसांनी मोठय़ा कारवाया केल्यानंतर गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले होते; मात्र त्यानंतर गुटखा माफियांनी शहरासह जिल्हय़ातील बहुतांश पोलीस स्टेशनला ह्यमॅनेजह्ण केल्याने त्यांच्यासाठी रान मोकळे झाले आहे. गुटखा माफियांवर संबंधित पोलीस स्टेशनकडून कारवाई होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाद्वारे कारवाईचा सपाटा लावण्यात आला होता; मात्र त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला. त्यानंतरही अमरावती येथे महसूल पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा जप्तीसाठी कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाला सोबत घेऊन जप्त करण्याचा अधिकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुटखा जप्त केल्यानंतर पुढील कारवाई पोलिसांनी न करता ती अन्न व औषध प्रशासन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा नियम असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे या गुटखा माफियांवर आता पुन्हा पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्यास अनेक युवकांना व्यसनाधीनतेपासून रोखल्या जाऊ शकते. राज्यात गुटखा बंदी होऊन १७ जुलै रोजी चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाही नव्याने अधिसूचना निघून वर्षभरासाठी पुन्हा मुदत वाढविली जाईल; मात्र मागील चार वर्षांचा अनुभव पाहता बंदी कागदोपत्री राहिली असून, गुटख्यासह मावा आणि सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री सुरू आहे. तरुण पिढी तोंडाच्या कर्करोगापासून दूर राहावी, या उद्देशाने बंदीचा निर्णय घेण्यात आला. कोणताही निर्णय घेतला की, त्याला पळवाटा शंभर असतात, अशी अवस्था बंदीची झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडील अपुरे मनुष्यबळ, खबर्यांच्या जाळ्याची कमतरता यामुळे सरसकट बंदी घालण्यात यश आले नाही.सध्या शहर व जिल्ह्यात यासोबतच सीमा भागात उघडपणे विक्री सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य सीमेवर असल्याने तेथून उत्पादीत गुटख्याची राजरोसपणे छुप्या मार्गाने आयात सुरू असते. रात्रीच्या वेळी व्यवहार होतो. सीमा भागातून आलेला माल कोणत्या गोडावूनमध्ये पोचवायचा आणि ती जबाबदारी कुणाची, याची साखळी कार्यरत आहे. शहरात आणि जिल्ह्यात महामार्गावर बिनदिक्कतपणे गुटखा मिळतो. पानटपरीवर उघडपणे पुड्या लटकविल्या जात नाहीत; मात्र पुडी आहे का, अशी विचारणा केली की, ती अलगदपणे बाहेर काढून दिली जाते.
फेरीवाल्यांच्या मदतीने होते गुटखा वाहतूक !
By admin | Published: July 20, 2016 1:26 AM