अमोल सोनोने
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पांढुर्णा शिवारात यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिली असून, परिसरात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सद्यस्थितीत हरभरा घाटे असलेल्या अवस्थेत, तर काही शेतकऱ्यांचा हरभरा सोंगणीला आला आहे. रात्रीच्या सुमारास रानडुकरे, नीलगायी, हरणांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करीत असल्याचे चित्र आहे. पांढुर्णा येथील शेतकरी दीपक पुंडलिक देवकते यांच्या एक एकरातील हरभरा वन्यप्राण्यांनी फस्त केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात रात्री मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याठी शेतकरी रात्री राखणीला जात असून, मुक्काम करीत आहेत. यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहेत. रबी हंगामावर आशा असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तत्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (फोटो)
-----------------------------------------------------------
खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज काढून रबी हंगामात पेरणी केली, चांगले उत्पादन होईल अशी आशा आहे; मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चिंता वाढली आहे. पंडित देवकते, शेतकरी, पांढुर्णा, ता. पातूर
------------------------------------------------------------------
पंचनामा करून मदत देण्याची मागणी
वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करून मदत देण्याची मागणी होत आहे.