दिव्यांगांना ओळखपत्रासाठी आॅनलाईन नोंदणी ठरतेय गैरसोयीची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:14 PM2019-02-03T13:14:17+5:302019-02-03T13:15:08+5:30
वाशिम : दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ‘स्वावलंबन’ प्रणालीद्वारे आॅनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ‘स्वावलंबन’ प्रणालीद्वारे आॅनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची गैरसोय होत आहे.
दिव्यांग व्यक्तींना एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्व प्रकाराबाबत दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. यामध्ये दृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहूदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, मेंदुचा पक्षाघात, स्नायुंची विकृती, स्वमग्नता, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, वाचा व भाषा दोष, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, अॅसीड अॅटॅक व्हिक्टिम, कुष्ठरोग, दृष्टिक्षीणता आदी २१ प्रकारातील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात केले जाते. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी संबंधित व्यक्तीला ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.स्वावलंबनकार्ड.इन’ या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. रुग्णालयातदेखील दिव्यांग व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन त्याचा अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरता यावा यासाठी स्वतंत्र कक्ष असणे आवश्यक आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दिव्यांग ओळखपत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वावलंबनकार्ड.इन या संकेतस्थळावर स्वत:ची वैयक्तिक अचूक माहिती भरून नोंदणी करावी. त्यानंतर प्राप्त होणारी प्रत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात संबंधित विभागाच्या बोर्डच्या दिवशी घेवून यावी व आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी केले होते. परंतू, आॅनलाईन नोंदणीसंदर्भात स्वतंत्र कक्ष नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ज्यांच्याकडे ‘एसएडीएम’ प्रणालीचे आॅनलाईन प्रमाणपत्र असेल, अशा दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावर माहिती भरावी. त्याची परत तपासणी करणे गरजेचे नाही. परंतु, त्यांनी स्वावलंबन कार्डमध्ये भरलेल्या अर्जाची प्रत जिल्हा सामान्य रुग्णालयात संबंधित विभागात जमा करणे बंधनकारक आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसºया बुधवारी अस्थिव्यंग तपासणी, प्रत्येक बुधवारी कर्णबधीर विभाग, प्रत्येक बुधवारी मानसिक विभाग व प्रत्येक बुधवारी नेत्र विभागाचे शिबीर आयोजित करण्यात येते.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात यावी. एक खिडकी योजना सुरू करून दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाशी चर्चाही केली, निवेदनही दिले. त्यांनी तोंडी आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही तर भविष्यात आंदोलन छेडले जाईल.
- मनिष डांगे,
उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ