हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:30 PM2019-02-03T13:30:49+5:302019-02-03T13:31:23+5:30
अकोला- जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली करण्यात आली आहे.
अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांची अखेर दहशतवाद विरोधी कक्षात बदली करण्यात आली आहे. अवैध धंदयांचा कर्दनकाळ असलेल्या अळसपुरेंच्या बदलीमुळे माफियांच्या कृत्याला यश मिळाल्याची चर्चा खात्यात जोरात सुरू आहे. जुगार अड्डे, वरली अड्डे, क्लब, दारुची अवैध विक्री करणारे माफिया, रेती माफिया, गुटखा माफिया यांच्यावर केलेल्या धडाकेबाज कारवायानंतर त्यांच्या बदलीसाठी फिल्डींग लावण्यात आली होती.
जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना हर्षराज अळसपुरे यांनी केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या काळात कारमधून नोटांची वाहतूक करणाऱ्यांवर छापेमारी करून कारवाई केली होती. या कारवायांमुळे
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ७ मार्च २०१७ रोजी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्यावर दिली होती. अळसपुरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदयावर छापेमारी करीत त्यांना सळो की पळो करून सोडले. याचप्रकारे गुटखा माफियांवरही कारवाईचा सपाटा लावला. त्यानंतर गुरे तस्करांच्या मुसक्या आवळत जिल्ह्यातील सर्वाधिक गुरांना वाचविण्याचे कामही या पथकाने केले. रेती माफिया, बिल्डरवर कारवाई करण्यात आली. वाशिम येथील नगराध्यक्षांच्या हत्याकांडातील आरोपींना अटक केली तर स्वस्तात सोन्याचे आमिष देऊन बनावट नोटांचा खेळ करणाºया टोळ्यांच्या मुसक्याही हर्षराज अळसपुरेंनी आवळल्या. त्यामुळे माफियांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच त्यांच्या बदलीसाठी फिल्डींग लावण्यात आली.
विशेष पथकाची कामगिरी
जुगार अड्ड्यांवर १६९ कारवाया करीत ६९२ आरोपींना अटक. त्यांच्याकडून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त, कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २८३ गुरांना जीवनदान देऊन ४० आरोपींना अटक. दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ५५ जणांवर कारवाई करीत ९० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, गौण खनिज चोरी प्रकरणात ६ कारवाया केल्या असून, २६ आरोपी अटकेत तर ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त. गुटखा माफियांवर २५ कारवाया करीत तब्बल १२ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त.
चर्चेतील कारवाया
कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करीत बनावट पुस्तके विक्रेत्यांवर कारवाई. जिल्हा परिषदेच्या हुक्काबाज शिक्षकांवर अकोल्याच्या इतिहासातील पहिलीच कारवाई करण्यात आली. स्फोटक साठा ठेवणाºयांवर कारवाईचा सपाटा तसेच मांडुळ जातीचा साप तस्करी करणारी टोळी अटक केली.