अकोला : काही दिवसांपासून पुन्हा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अकोल्याचे तापमान ४१.७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी बाहेर निघताना काळजी घेण्याची गरज आहे. मध्य महाराष्ट्र, परिसर व दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असून बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात पुढील दोन-तीन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते अंदमानच्या उत्तर भागात सरकेल. हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागातील तीव्र कमी दाबाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल. अवकाळीनंतर आता जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मंगळवारी ४१.७ अंश सेल्सिअस होते. ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून पारा वाढणार आहे. ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून पारा वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले.
एप्रिल-मे तापणार
मार्च महिन्यात अवकाळी पावसाचे आगमन व ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी-जास्त प्रमाणात होते. पहिल्या आठवड्यात ४० अंशावरील तापमान २८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मार्च महिन्याच्या शेवटीच ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने एप्रिल-मे महिना चांगलाच तापण्याची शक्यता आहे.