या गावात गेल्या दोन वर्षांपासून वीज नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील टिटवा गावात जावे लागते. पिण्याचे पाणीसुद्धा दीड किलोमीटर अंतरावरील एका विहिरीतून आणावे लागते. सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणसुद्धा सोडले आहे. या लहानशा तांड्यावर स्वातंत्र्यानंतरही विविध समस्या आहेत. येथील हा बहुगुलीत समाज नरकयातना भोगत असून, शासनाच्या विविध योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही. लोकप्रतिनिधींचेसुद्धा लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तुमचं गाव रेकॉर्डवर नाही!
गावात वीज पुरवठा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी वारंवार चकरा मारल्या. परंतु, बार्शीटाकळी वीज कंपनीचे अधिकारी म्हणतात की, तुमचं गाव रेकॉर्डवर नाही. तांड्यावरील मोहन मधुकर पवार, एकनाथ जाधव, भारत राठोड, परशुराम चव्हाण हे ग्रामस्थ सांगतात की, गावात कधी ग्रामसेवक दिसला नाही. पिण्याचे पाणी दीड किमीवरील एका विहिरीतून आणावे लागते. सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.