नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात अनेक आंदोलनं, धरणे होतात; परंतु त्या आंदोलनांचे स्थळ हे नियोजित असतात. पोलीस ठाण्यांमध्येही अनेकदा आंदोलने, धरणे होतात; परंतु देशाच्या इतिहासात कधी पोलीस मुख्यालयात आंदोलन झालेले नाही; परंतु माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने पोलीस मुख्यालयातच शेतकर्यांचे आंदोलन सुरू करून इतिहास रचला. अनेकदा आंदोलनाचे स्थळ निश्चित केलेले असते. शेतकरी जागर मंचच्या शेतकरी आंदोलनाचे स्थळसुद्धा निश्चित होते. शेतकर्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील सर्वच शेतकरी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना भेटायला जात असताना, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आणि पोलीस मुख्यालयात आणले आणि आता आंदोलन संपेल, असा पोलिसांचा कयास होता; परंतु यशवंत सिन्हा, रवीकांत तुपकर यांनी आम्ही चालत येथे आलो नाही. आम्हा शेतकर्यांना कोणत्या कलमान्वये ताब्यात घेतले, हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे, तरच आम्ही येथून जावू, असे ठणकावले. यावर पोलीस निरूत्तर झाले. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत पोलीस मुख्यालयाच्या मैदानातच आंदोलन सुरू केले. चार दिवस पोलीस मुख्यालयात चाललेले आंदोलन देशपातळीवरील पहिलेच आहे. याचा उल्लेख यशवंत सिन्हा यांनीसुद्धा केला.
चौथ्या दिवशीही आंदोलनात विविध संघटनांचा सहभागयशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकरी आंदोलनात चौथ्या दिवशीही जिल्हय़ातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. आंदोलनामध्ये बुधवारी सकाळी मुंबईवरून उद्योजक एकनाथ दुधे, भोकरदनचे जि.प. सदस्य केशव पाटील जवंजाळ सहभागी झाले. बुधवारी दुपारी शेकापचे प्रदीपभाई देशमुख, छावाचे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे हे दीडशे कार्यकर्त्यांसह घोषणा देत, आंदोलनात सहभागी झाले. तसेच आ. बच्चू कडू यांच्या प्रहारचे प्रशांत भारसाकळ, सुहास साबे, अमोल खोबरखेडे, नम्रता ठोकळ, ज्ञानेश्वर देशमुख, शिवा सरप, श्रीकांत नकासकर, राधेश्याम कळस्कार, बॉबी पळसपगार, संदीप तंवर, विक्की कांबे, आकाश राजुस्कर, आदींचाही सहभाग होता. अकोला बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ अँड. सुभाष काटे, अँड. नंदकुमार बोर्डे, अँड. डी.एल. म्हसाये, अँड. विनोद साकरकर, अँड. मो. परवेज, अँड. अनंत खेळकर, भीमकायदा संघटनेचे प्रशांत निघोट, अ.भा. छावाचे जिल्हा प्रमुख रणजित काळे, भाकपचे देवराव पाटील हागे, आपचे बडनेरा विधासभा निरीक्षक प्रमोद कुचे, रंजना मामर्डे, नरेंद्र पुनकर, देवानंद गहिले, मो. इरफान, रुस्तम शहा, आलिम पटेल, राहुल चव्हाण, गजानन गाडगे, किरण गुडधे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
अरे भाई, मैं तो भाजपा का हूँ न !आंदोलनाला भाजपा वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, प्रहार संघटना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या सर्व पक्षांचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले नाहीत, तरी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या भेटीला तर येऊ शकले असते, असा सूर आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये होता. त्यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अरे भाई..कौन बोलता है की, भाजपा आंदोलन में सहभागी नहीं है..मैं तो भाजपा का हूँ न. असे म्हटले आणि शेतकर्यांमध्ये एकच हशा पिकला.
पोलीस ध्वजाला दिली सलामीपोलीस मुख्यालयात आंदोलन होण्याची पहिलीच वेळ होती. यशवंत सिन्हा यांचे भाषण सुरू असताना मुख्यालयातील पोलीस ध्वज सायंकाळी उतरविण्याची वेळ झाली, त्यावेळी बिगुल वाजला. बिगुलचा आवाज ऐकताच सिन्हा यांनी भाषण थांबविले व सर्व शेतकर्यांनी जागेवर उभे राहत ध्वजाला सलामी दिली. यानंतर सिन्हा यांनी अब किसान जवान की भाषा समझने लगे; असे सूचक वक्त व्य केले.
वर्हाडी कवी विठ्ठल वाघ दिवसभर आंदोलनातप्रसिद्ध वर्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, सर्वोदयी नेते महादेवराव भुईभार, अँड. रामसिंग राजपूत यांनी शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. विठ्ठल वाघ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य नेते रविकांत तुपकर, शेतकर्यांसह मैदानावरच भोजनाचा आस्वाद घेतला.