हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:13 PM2020-01-17T14:13:22+5:302020-01-17T14:13:34+5:30
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांसह इतर महिला कर्मचाऱ्यांना ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण दिले.
अकोला : ‘नशिबाने मिळाला आपणास आरोग्य सेवेचा मान, जनजागृतीचा जपू वसा घेऊ हेच हळदी-कुंकवाचे वाण...’ हा उखाणा म्हणत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांसह इतर महिला कर्मचाऱ्यांना ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण दिले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे नेहमीच विविध स्तरावर एचआयव्हीबाबत जनजागृती उपक्रम राबविले जातात; पण ज्यांचा नेहमीच रुग्णांशी संबंध येतो अन् रक्त संक्रमणातून त्यांना एचआयव्हीसारख्या आजारांचा धोका संभावतो, अशा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया महिलांमध्येही एचआयव्हीबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या रिना धोटे, सविता बोरकर, सुमेरा खान, आरती पाठक यांच्यासह इतर महिला कर्मचाऱ्यांनी राबविला.
८० पेक्षा जास्त महिला कर्मचाºयांचा सहभाग
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात ८० पेक्षा जास्त महिला कर्मचाºयांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहभागी महिला कर्मचाºयांना वाणात एचआयव्हीबाबत माहिती देणारी माहिती पुस्तिका देण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभागातील महिला कर्मचाºयांसह नर्सिंग कॉलेजमधील महिला कर्मचारी व परिचारिकांचा समावेश होता.
अशीही होणार जनजागृती
हळदी-कुंकूच्या कार्यक्रमानंतर सहभागी प्रत्येक महिला कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणाºया महिलांमध्ये याबाबत जनजागृती करणार आहेत. त्यामुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या या छोट्याशा उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.