हॉकीचे मैदान, विज्ञान केंद्र अन् बालसुरक्षेला प्राधान्य! -बालदिनानिमित्त पालकमंत्र्यांनी दिली ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:22 PM2018-11-14T12:22:52+5:302018-11-14T12:23:29+5:30
शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
अकोला : राजकारणात जनतेचा सेवक म्हणून काम करायचे असून, महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात परिपूर्ण बनविण्याचे ध्येय आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर न्यायचे आहे. शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विज्ञान केंद्रासाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच विज्ञान केंद्र उभे राहील, तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून १४ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येते. बालदिनानिमित्त लोकमत कार्यालयात सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची मुलाखत आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी शहरातील निवडक शाळांमधून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत दोन तास मुक्त संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या समर्पक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांची मुलाखत घेताना त्यांचे बालपण, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि राजकारणासोबतच त्यांचे जिल्ह्याच्या विकासाविषयीचे व्हिजन जाणून घेतले. शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अकोला शहर आणि जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी कोणत्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, याविषयीसुद्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी आणि सामाजिक विकास व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आणि नीट परीक्षा केंद्र सुरू झाले!
लोकमत कार्यालयात दोन तास रंगलेल्या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षेसाठी केंद्र शासनाने नीट परीक्षा अनिवार्य केली. या परीक्षेचे केंद्र अकोल्यात सुरू करावे, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. पाटील यांनी अमरावती विभागात केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे, असे सोमवारी विद्यार्थ्यांना सांगितले आणि मंगळवारीच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना पत्र पाठवून केंद्र शासनाने अकोला, बुलडाणा आणि अमरावतीमध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू केले, असे कळविले.