अकोला : पुसद शहरातील पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी मंजुरी दिलेल्या गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी केली.पुसद शहरात बकरी ईदच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर २०१५ रोजी अब्दुल मलिक अब्दुल रजाक व त्याचे साथीदार शोएब खान, अब्दुल मलिक ऊर्फ सलीम ऊर्फ हफीजुर रहेमान या तिघांनी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी सदर तीन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दहशतवादविरोधी पथकाने सुरू केलेल्या या तपासामध्ये सदर तीन आरोपीपैंकी अब्दुल मलिक अब्दुल रजाक हा दहशतवादी असल्याच्या हालचाली त्याच्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. देशविघातक कृत्य करीत असल्याचेही दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. त्यानंतर या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने गृह मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव बक्षी यांनी गृह मंत्रालयाची मंजुरी तसेच विधी व न्याय समितीच्या मंजुरीनंतर सदर तीनही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर गुरुवारी याच विषयावर बक्षी यांची दहशतवादविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयात ‘व्हीसी’द्वारे साक्ष घेण्यात आली असता आरोपींचे वकील अॅड. दिलदार खान यांनी सदरची मंजुरी देण्याचे अधिकार मुख्य सचिवांनाच असल्याने बक्षी यांनी कायद्याचा भंग केल्याचा मुद्दा मांडला, तसेच बक्षी यांच्या साक्षची उलटतपासणी केली. या प्रकरणात शुक्रवारी पुसदच्या शहर पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने अॅड. दिलदार खान, अॅड. नजीब शेख व अॅड. अली रजा यांनी कामकाज पाहिले.पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये धागेदोरेदहशतवादविरोधी पथकाने तपास करीत असताना यामधील मुख्य आरोपी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याचे पाकिस्तान व अफगाणिस्तान या ठिकाणावर दहशवाद्यांची धागेदोरे असल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती आहे.