मालमत्तांचे ‘रेकाॅर्ड’ अद्ययावत करण्याचे काम किती झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:39+5:302021-04-10T04:18:39+5:30
अकोला: जिल्हा परिषद मालकीच्या जिल्ह्यातील मालमत्तांचे ‘रेकाॅर्ड’ अद्ययावत करण्याचे काम किती पूर्ण झाले, यासंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ...
अकोला: जिल्हा परिषद मालकीच्या जिल्ह्यातील मालमत्तांचे ‘रेकाॅर्ड’ अद्ययावत करण्याचे काम किती पूर्ण झाले, यासंदर्भात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी विचारणा करण्यात आली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद मालकीच्या जागा, जुन्या इमारती इत्यादी मालमत्तांचे दस्तावेज अद्ययावत करणे तसेच जिल्हा परिषद मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम किती झाले, यासंदर्भात सदस्य प्रशांत अढाऊ यांनी सभेत विचारणा केली. मालमत्तांचे रेकाॅर्ड अद्ययावत करण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सभेत दिली. वाडेगाव येथील बाजाराच्या ठिकाणी काही लोकांना तत्कालीन ग्रामसेवकांमार्फत जागांचे नमुना ८ अ देण्यात आले असून, यासंदर्भात चौकशी करुन देण्यात आलेले नमूना ८ अ रद्द करण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सभेत केली. मागील सभेच्या इतिवृत्तास मान्यता देत कोणत्याही निर्णयाविना स्थायी समितीची सभा संपविण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ काॅन्फन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, प्रकाश अतकळ यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.