कोरोनाचा कहर तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:10 AM2020-06-20T10:10:16+5:302020-06-20T10:10:31+5:30
यंदा कोविडची साथ असूनही गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा मृत्यूदर कमीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ वर पोहोचल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतकांना कोरोनाव्यतिरिक्त गंभीर अनियंत्रित जुनाट आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाणही ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे सर्वौपचार मध्ये गतवर्षी झालेल्या मृत्यूच्या आकड्यांची तुलना केल्यास यंदा कोविडची साथ असूनही गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा मृत्यूदर कमीच आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दररोज मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अकोलेकरांचे लक्ष मृत्यूच्या संख्येकडे वेधले असून, अनेकांच्या मनात धडकी भरली आहे; मात्र गत वर्षी जानेवारी ते जून महिन्यातील मृत्यूच्या आकड्यांशी तुलना केल्यास यावर्षी गत सहा महिन्यात सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमीच आहे. कोरोनाने एप्रिल महिन्यात जिल्ह्यात शिरकाव केला असून, या महिन्यात कोरोनाचे चार बळी, तर मे महिन्यात २८ बळी गेले. तर जून महिन्यात गत १९ दिवसांत २७ बळी गेले आहेत. तर जानेवारी २०२० ते जून २०२० पर्यंत ८७० जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत कोरोना नसतानाही गतवर्षी १ हजार १०३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभिलेखा विभागाकडून ही आकडेवारी मिळाली असून त्यानुसार, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी मृत्यूचा दर मागील वर्षीच्या तुलनेत कमीच आहे.
गतवर्षी एप्रिल-मे महिन्यात ३८१ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे दररोज मृतकांचा आकडा वाढत असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे वेधले आहे; परंतु गतवर्षी एप्रिल-मे महिन्यातील मृत्यूदर हा ३३ ने जास्त होता. गत वर्षी या दोन महिन्यात ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर यंदा ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा निरंतर प्रयत्नशील आहे. मृतकांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त इतरही गंभीर आजार होते. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना असूनही मृत्यूदर कमी आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला