अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये, या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये अकोला परिमंडळातील बुलडाणा, वाशिम व अकोला मंडळातील 26 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना झाल्या असून, अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या आणि त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसांत प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. यानुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडळातील सर्वाधिक १४ तर त्याखालोखाल नागपूर ग्रामीण, बुलडाणा व यवतमाळ मंडळातील प्रत्येकी १०, अकोला मंडळातील ९, अमरावती मंडळातील ८, वाशिम मंडळातील ७, गडचिरोली मंडळातील ५, नागपूर शहर मंडळातील ४, भंडारा मंडळातील ३ तर चंद्रपूर मंडळातील १ अशा एकूण ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ८१ मध्ये वेतनश्रेणी दोनमधील ९, वेतनश्रेणी तीनमधील २४ तर वेतनश्रेणी चारमधील ५७ जणांचा समावेश आहे.३५ जणांना कारणे दाखवायाशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामीण मंडळातील १८, वर्धा मंडळातील १२, नागपूर शहर मंडळातील ४ तर यवतमाळ मंडळातील एका कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, यात वेतनश्रेणी दोनमधील ३, वेतनश्रेणी तीनमधील ९ तर वेतनश्रेणी चारमधील २३ जणांचा समावेश आहे.