‘एमकॉम’च्या फेरपरीक्षेला शेकडो विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 02:04 PM2019-06-23T14:04:54+5:302019-06-23T14:05:02+5:30
२२ जून रोजी पाचही जिल्ह्यांत एम.कॉम. द्वितीय सत्राच्या कॉम्प्युटर अप्लिकेशन इन बिजनेस या विषयाची फेरपरीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली.
अकोला : विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर अमरावती विद्यापीठातर्फे शनिवार, २२ जून रोजी पाचही जिल्ह्यांत एम.कॉम. द्वितीय सत्राच्या कॉम्प्युटर अप्लिकेशन इन बिजनेस या विषयाची फेरपरीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने किती गांभीर्य घ्यावे, असा सवाल परीक्षा केंद्रावरील प्राध्यापकांनी उपस्थित केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी २०१९ च्या परीक्षांमध्ये चुकीच्या प्रश्नपत्रिकांसह काही ठिकाणी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विषयांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, अमरावती विद्यापीठाने एम.ए., एम.कॉम. आणि एल.एल.बी. अभ्यासक्रमांच्या काही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर एम.कॉम. द्वितीय सत्रातील ‘कॉम्प्युटर अॅप्लिकेशन इन बिजनेस’ या विषयाची परीक्षा घेण्यात आली; परंतु या परीक्षेकडे पाठ फिरवित पाचही जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचा प्रकार निदर्शनास आला. अकोल्यातील शिवाजी महाविद्यालय, ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय तसेच तेल्हारा येथील एका परीक्षा केंद्रावर प्रत्येकी सहा ते दहा विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. हा प्रकार पाहून परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘त्या’ विद्यार्थ्यांच्या जुन्याच उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन
एम.कॉम. द्वितीय सत्राच्या कॉम्प्युटर अॅप्लिकेशन इन बिजनेस या विषयाची परीक्षा २५ मे रोजी घेण्यात आली होती. तांत्रिक अडचणींमुळे झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठाने या विषयाची फेरपरीक्षा शनिवार, २२ जून रोजी घेतली. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जुन्याच उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली, त्यांच्या नव्याने उत्तरपत्रिका तपासण्यात येणार आहेत.
शनिवारी विद्यापीठांतर्गत एम.कॉम. द्वितीय सत्राच्या कॉम्प्युटर अॅप्लिकेशन इन बिजनेस या विषयाची फेरपरीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घेण्यात आली; परंतु परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती चिंतनाचा विषय ठरला.
- प्रा. डॉ. संजय तिडके, शिवाजी महाविद्यालय अकोला.