अकोला: पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादात माहेरी गेल्याने त्रस्त पतीने तिच्या भेटीसाठी थेट उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर (हायटेन्शन टॉवरवर) चढून आपली व्यथा गावभर केली. अकोल्यानजीकच्या भौरद-बाखराबाद मार्गावरील एका हायटेन्शन टॉवरवर चढून पत्नीच्या भेटीसाठी आकांडतांडव करणाऱ्या पतीला ग्रामस्थ, पोलीस व अग्निशमन यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर खाली उतरविण्यात यश आले. रविवारी दुपारी ३ तास हे थरारनाट्य सुरू असल्याने येथे मोठी गर्दी जमली होती.डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भौरद- बाखराबाद मार्गावरील एका हायटेन्शन वीज खांबावर एक इसम चढला असून, तो आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. भौरद येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलीस येईपर्यंत ग्रामस्थांनी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने पत्नीला भेटायचे आहे म्हणून टॉवरवर चढलो असून, भेट न झाल्यास आत्महत्या करीत असल्याचे ओरडत होता. भौरद येथील जावई असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या पत्नीला घटनास्थळी बोलावले. त्यांची पत्नी व ग्रामस्थांनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली; परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हता. त्यानंतर काही वेळात डाबकी रोड पोलीस व मनपाची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पत्नीला भेटायचे आहे. तिने होकार दिला तरच खाली उतरण्यास तयार होईल, अन्यथा उडी घेऊन आत्महत्या करेल, अशी आरडा-ओरड त्याने सुरू केली. दारूच्या नशेत असल्याने जीवाचे बरे-वाईट करू नये म्हणून पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले; मात्र मी खाली आल्यावर तुम्ही मला पकडाल. येथून निघून जा, मी खाली उतरतो, असे तो पोलिसांना म्हणत होता. पोलीस थोडे दूर जाताच तो खांबावरून खाली उतरला आणि पळून गेला. घरगुती वादामुळे मद्यप्राशन करून त्याने ही टोकाची भूमिका घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती.