अकोला : कॅन्सरबाबत लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. जर प्राथमिक अवस्थेतच या आजाराचे निदान झाल्यास ‘कॅन्सर’वर पूर्णपणे मात करणे शक्य असल्याची माहिती कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित यांनी दिली. ‘लोकमत’च्या एक जीवन स्वस्थ जीवन’ मोहिमेंतर्गत लोकमत सखी मंच व कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता माहेश्वरी भवन येथे ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्यासपीठावर ‘आयएमए’चे अध्यक्ष पुरुषोत्तम तायडे, तुकाराम हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. माहेश्वरी, कोकीलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाराष्ट्रात ‘लोकमत’च्या माध्यमातूनच कॅन्सरमुक्तीसाठीचा सामाजिक संदेश करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थितांच्या मनातील शंकाही दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. इमरान निसार शेख यांनी सांगितले की, कॅन्सर महिला व पुरूष दोघांनाही होऊ शकतो; मात्र पुरुषांमध्ये प्रमाण जेमतेम १ टक्का आहे. महिलांना धोका अधिक आहे; मात्र ५० टक्के महिला त्रास झाला तरी अंगावर काढतात. काही गाठ असल्याचे समजले तरी भीतीपोटी व लाजेपोटी लपवून ठेवतात. समजल्यावर उपचारासाठी येतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे उपचारही कठीण होतात. त्यामुळे स्तनात गाठ झालेली असल्यास लपवू नका. लगेचच डॉक्टरांकडे जा, असा सल्ला त्यांनी दिला. चांगला आहार घ्या, घाम येईपर्यंत व्यायाम करा. तसेच जशी शरीराची काळजी घेतात, तशी महिन्यातून एकदा पाच मिनिट काढून स्तनांची स्वत:च तपासणी करून गाठ नाही ना? याची खात्री घ्या. स्तनावर तीळ येणे, रक्त येणे, गाठ होणे ही कॅन्सरची लक्षण असू शकतात, असे सांगितले. यावेळी डॉ. इमरान निसार शेख यांनी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी कॅन्सरमुळे स्वत:चा कुटुंबीयांना गमावलेल्या सदस्याच्या समस्यांचे निरसन केले. त्यासाठी देवानेच शक्ती दिली. त्यामुळे कॅन्सर झालेल्या रुग्णाने अथवा त्याच्या कुटुंबियांनी घाबरून न जाता धैर्याने सामोरे जावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा गाडगे यांनी केले.
निदान लवकर झाल्यास कॅन्सरवर मात शक्य
By admin | Published: April 27, 2017 1:29 AM