अकोला : शिवनी येथील महिला डॉक्टर आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. मनपा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत महिला डॉक्टरसह एक दलाल आणि न्यू तापडीयानगरातील एका महिलेस पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारी रोडवरील शिवणी येथे डॉ. रोशनी गावंडे(देशमुख) हिचा दवाखाना असून, तिच्याकडे बीएचएमएसची पदवी आहे. ही डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषधी प्रशासनाच्या सहकार्याने शुक्रवारी दुपारी बनावट गर्भवती महिलेला डॉ. रोशनी गावंडे हिच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठविले. यावेळी डॉ. गावंडे हिने या महिलेची तपासणी केली आणि गर्भपातासाठी महिलेकडून दहा हजार रूपये उकळले. त्यानंतर या महिलेला दलाल गोपाल माधव गायकवाड((रा. विठ्ठल नगर मोठी उमरी) याच्याकडे पाठविले. याठिकाणी महिला गेल्यावर गायकवाड हा महिलेला सुनंदा महादेव आढे(लाजुरकर) रा. न्यू तापडिया नगर हिच्याकडे घेऊन गेला. याठिकाणी सुनंदा आढे हिने महिलेला काही गोळ्या व औषधे दिले आणि महिलेकडून १४ हजार रूपये घेतले. पोलिसांना खात्री झाल्यावर, त्यांनी याठिकाणी छापा घातला आणि डॉ. रोशनी गावंडे हिच्यासह दलाल गोपाल गायकवाड, सुनंदा आढे हिला ताब्यात घेतले. तिघांनाही स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या गर्भपाताच्या किट्स, गोळ्या व औषधी व सलाईनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. महिला डॉक्टर व तिचे दोन एजंट यांनी आतापर्यंत अनेक अवैध गर्भपात केले आहेत. किती वर्षांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. आतापर्यंत किती अवैध गर्भपात केले. याची पोलीस चौकशी करीत आहेत. पीसीपीएनडीटी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूख शेख, पीएसआय छाया वाघ, पोलीस कर्मचारी गणेश पांडे, सचिन काटकर, फिरोज खान, अश्विन सिरसाट यांनी केली.