गोलेच्छा पिता-पुत्राविरुद्ध अवैध सावकारीचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:06 AM2017-11-10T02:06:24+5:302017-11-10T02:07:41+5:30
अकोला : अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील १५ शेतकर्यांच्या तब्बल ११५ एकर शेतजमीन खरेदी-विक्री, गहाणबाबत झालेले व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून केल्याचे समोर आल्याने, अखेर गुरुवारी गोलेच्छा पिता-पुत्रासह एका महिलेविरुद्ध अवैध सावकारी अधिनियमानुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील १५ शेतकर्यांच्या तब्बल ११५ एकर शेतजमीन खरेदी-विक्री, गहाणबाबत झालेले व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून केल्याचे समोर आल्याने, अखेर गुरुवारी गोलेच्छा पिता-पुत्रासह एका महिलेविरुद्ध अवैध सावकारी अधिनियमानुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही शेतकर्यांनी उपनिबंधकाकडे तक्रारी केल्यानंतर व पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षकांकडे सावकारग्रस्त शेतकरी गेले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रमेशचंद्र गोलेच्छा, विक्रमचंद्र रमेशचंद्र गोलेच्छा दोघेही राहणार लक्ष्मी नगर गोरक्षण रोड व उषा रमेशचंद्र जालोरी रा. खोलेश्वर यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
बर्याच कालावधीनंतर गुन्हा दाखल
याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या; मात्र अवैध सावकाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले नाही. अखेर त्रस्त शेतकरी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात गेले. तेथे पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरही या प्रकरणात गुन्हे दाखल होत नसल्याने सावकारग्रस्त शेतकरी पोलीस अधीक्षकांकडे गेले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाई झाली.
सावकारग्रस्त शेतकरी मनोजकुमार बाबाराव दाळू यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या शेतजमीन खरेदी-विक्री, गहाणबाबत झालेले व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक गोपाल मावळे यांनी हे व्यवहार अवैध असल्याचे ३ मे रोजी घोषित केले होते. दरम्यान, सोमवारी संबंधित शेतकर्यांना सात-बाराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते जनता दरबारात करण्यात आले होते. एकूण ११५ एकर ५३ गुंठे आणि एक फ्लॅट अवैध सावकारीतून मुक्त करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील नरेंद्र दशरथ धार्मिक (५५) रा. गाडगे नगर हरिहरपेठ यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २0१४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणातील आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
असा घडला प्रकार
अकोल्यातील गोरेगाव खुर्द येथील भास्कर काशीराम वाकोडे यांच्यासोबत असाच प्रकार झाला आहे. याप्रकरणी २0१२ मध्ये अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांनी तालुका उपनिबंधकांकडे याचिका दाखल केली होती. आरोपींनी या प्रकरणात तिन्ही जिल्ह्यातील ११५ एकर जमीन हडप केली होती. शिवाय, ५00 ते ६00 एकर जमिनीची देवाण-घेवाण झाल्याची माहिती आहे. या याचिकेवर २४ सप्टेंबर २0१५ रोजी तालुका उपनिबंधकांनी शेतकर्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर २४ एप्रिल २0१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी अंतिम निकाल देऊन सर्व व्यवहार रद्द केले होते.