अकोला : अकाेट तालुक्यातील अकाेली जहांगीर येथील स्वस्त धान्य दुकानात १७ लाखांपेक्षा अधिक किमतीचा धान्याचा अवैध साठा आढळून आला. या प्रकरणात आमदार रणधीर सावरकर यांनी साेमवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला हाेता. या प्रश्नाच्या उत्तरात अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदर प्रकरणाला जबाबदार अधिकाऱ्यांचीही चाैकशी करावी, असे आदेश दिले आहेत.
अकोली जहांगीर येथील रेशन दुकानदार अशोक तुकाराम गोठवाड यांच्या दुकानावर २३ सप्टेंबर २०२० रोजी तपासणी पथकाने धाड टाकून १७ लाखांपेक्षा अधिक किमतीचा शेकडो क्विंटल अवैध धान्यसाठा जप्त केला हाेता. या प्रकरणात आमदार रणधीर सावरकरांनी माेठी शृखंला लपली असल्याचे नमूद केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय असा भ्रष्टाचार हाेऊ शकत नाही, असे ठामपणे सांगताना त्यांनी दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. धान्यसाठा जप्त केला आहे. लाखो रुपयांच्या धान्याची वसुली प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस केस केली आहे. ह्या सर्व गोष्टी शासनाने जरी कबूल केल्या तरी अशी भ्रष्टाचारांची प्रकरणे शासकीय अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय घडणे शक्य नाही, त्यामुळे याला दोषी अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी करून कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. याची दखल घेत राज्यमंत्री कदम यांनी चाैकशीचे आदेश दिले.
धान्य दुकानदाराचे उत्पन्नाचे स्रोत तपासा
अकोली जहांगीर येथील अशोक तुकाराम गोठवाड या ‘रेशन’माफियावर २३ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी छापा मारून १७ लाख रुपयांचा शेकडो क्विंटल अवैध धान्यसाठा जप्त केला. सातपुड्याच्या डोंगर भागात तीस-चाळीस आदिवासी खेड्यांमध्ये भाडेपट्टीवर हा रेशन दुकानदार मागील १५ ते २० वर्षांपासून रेशन दुकान चालवतो. एकाच दुकानात १७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार होऊ शकतो; तसेच मागील १५ वर्षांत अशोक गोठवाड या रेशन माफियाविरोधात अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे त्याची चाैकशी करून या भ्रष्ट रेशन दुकानदारांचे प्रसंगी आर्थिक स्रोत व आयकर विवरणसुद्धा तपासून घ्यावे, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली.