मूर्तिजापूर : मध्यरात्री नदीपात्रात रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करून वाहतूक करीत असलेले पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.मध्यरात्री सांगवा मेळ येथील पूर्णा नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून चार ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना मिळाली. या माहितीनुसार १९ डिसेंबर रोजी मंडळ अधिकारी रामराव जाधव यांच्या पथकाने धाड टाकून ट्रॅक्टर मालक राजू हरिश्चंद्र सोळंके, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एबी ५४३९, शरद कैलास सिरसाट, एमएच ३० एबी ७६८९, दिवाकर देवीदास सोळंके, एमएच २७ एल ६१८४, राम शंकर गावंडे, एमएच ३०- ७२१५ सर्व राहणार सांगवा मेळ व १३ डिसेंबर रोजी तलाठी दिनकर ठाकरे यांनी हातगाव परिसरातील कमळगंगा नदीतून रेती उपसा करताना निवृत्ती ज्ञानदेव ढाकुलकर अशा पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या गौण खनिजाकरिता प्रतिब्रास ३ हजार रुपये बाजारभावाप्रमाणे व त्यावर पाचपट दंडाची रक्कम १५ हजार तसेच स्वामित्वधन शुल्काची रक्कम ८३३ रुपये असे एकूण एका ब्रासकरिता १५ हजार ८३३ रुपये, जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरकरिता १ लाख रुपये व गौण खनिज बाजार मूल्याच्या पाचपट दंड १५ हजार ८३३ असा एकूण १ लाख १५ हजार ८३३ अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात उपरोक्त ट्रॅक्टरधारकांना रकमेचा भरणा करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यांनी ट्रॅक्टरच्या बाजारभाव मूल्यांच्या किमतीएवढा जातमुचलका तीन दिवसांच्या आत सादर करावा, असाही आदेश देण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, मंडळ अधिकारी रामराव जाधव, तलाठी सुनील मोहोड, तलाठी दिनकर ठाकरे व कोतवाल विशाल साखरे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)