अकोला शहरात होर्डिंग्ज उभारण्याचे निकष, नियम पायदळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:48 PM2018-06-02T15:48:37+5:302018-06-02T15:48:37+5:30
अकोला: महापालिका क्षेत्रात होर्डिंग्ज, बॅनर उभारण्याचे निकष, नियमावली आहे. खुद्द मनपा प्रशासनानेच नियमावली गुंडाळून ठेवल्यामुळे की काय, होर्डिंग्ज उभारणाऱ्या संचालकांनी संपूर्ण शहराची ऐशीतैशी करून ठेवल्याचे चित्र आहे.
अकोला: महापालिका क्षेत्रात होर्डिंग्ज, बॅनर उभारण्याचे निकष, नियमावली आहे. खुद्द मनपा प्रशासनानेच नियमावली गुंडाळून ठेवल्यामुळे की काय, होर्डिंग्ज उभारणाऱ्या संचालकांनी संपूर्ण शहराची ऐशीतैशी करून ठेवल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख चौक, खासगी इमारती, दुकानांच्या छतावर वाट्टेल त्या पद्धतीने होर्डिंग्ज उभारले आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, पैशांच्या लोभापायी बहुतांश शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या आवारातच एजन्सी संचालकांना जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या प्रकाराकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभाग संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे.
शहरात उभारल्या जाणाऱ्या होर्डिंग्ज-बॅनरच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने उठसूठ कोणीही एजन्सीचे गठन करून मोक्याच्या जागेवर होर्डिंग्ज उभारत असल्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मनपाची परवानगी बहाल करणाºया संबंधित अधिकारी-कर्मचाºयांची खिसे जड क रून एजन्सी संचालक त्यांना अपेक्षित जागेवर होर्डिंग्ज उभारण्यात कोणतीही कसर ठेवत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आज रोजी शहराच्या कोण्याही कोपºयात चक्कर मारल्यास प्रमुख चौक, रहिवाशांच्या इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच शैक्षणिक संस्थांच्या खुल्या जागांमध्ये भलेमोठे होर्डिंग्ज-बॅनर उभारल्याचे दिसून येईल. अर्थातच, एजन्सी संचालकांच्या हातातील बाहुले असलेल्या मनपातील संबंधित अधिकारी-कर्मचाºयांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संपूर्ण शहराच्या विद्रुपीकरणाला मनपा प्रशासनच हातभार लावत असल्याचा सूर उमटत आहे.
नव्याने निविदा प्रक्रिया का नाही?
संबंधित अधिकारी, कर्मचाºयांचे आर्थिक सोपस्कार पार पाडून काही एजन्सी संचालकांनी शहरातील मोक्याच्या जागांवर होर्डिंग्ज, बॅनर उभारले आहेत. याव्यतिरिक्त अनधिकृत होर्डिंग्जची संख्या मोठी आहे. हा प्रकार पाहता प्रशासनाने ठराविक जागा निश्चित करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा ठराव मनपाच्या स्थायी समितीने घेतला होता. प्रशासनाच्या हिताचा ठराव असताना आजवर निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होतो.
मुख्य नाल्यात होर्डिंग्ज कसे?
सद्यस्थितीत शहरातील सर्वात मोठे होर्डिंग्ज सिटी कोतवालीसमोर असणाºया चक्क मुख्य नाल्यात उभारण्यात आले आहे. नाल्यामध्ये होर्डिंग्ज उभारण्यासाठी परवानगी देणारा कर्मचारी लाच स्वीकारल्याप्रकरणी आज रोजी निलंबित आहे. मुख्य नाल्यात होर्डिंग्ज उभारण्याच्या बदल्यात मोठा आर्थिक व्यवहार पार पडला असून, होर्डिंग्ज प्रशासन कधी काढणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.