प्रभाव लोकमतचा : ‘त्या’ १२० रास्तभाव दुकानांना धान्य पुरवठा करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:01 PM2019-06-05T13:01:16+5:302019-06-05T13:01:21+5:30
‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत, जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी दिले.
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याचे धान्य वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला असला तरी, १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही, अशा आशयाचे वृत्त मंगळवार, ४ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जून महिन्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी गहू व तांदुळाचा धान्यसाठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार ३ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ९४० दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्त भावाच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले नाही. असे वृत्त ४ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, अद्याप धान्य पोहोचले नसलेल्या जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करून, शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण सुरू करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.
जिल्ह्यातील ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. अद्याप धान्य पोहोचले नसलेल्या जिल्ह्यातील १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करून, रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण सुरू करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना ४ जून रोजी पत्राद्वारे दिले आहेत.
-गजानन सुरंजे
उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी