खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे यांची पालकमंत्री बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून कानउघाडणी केली आहे. सावरगाव येथे सिंगल फेजचे दोन रोहित्र असूनही गावाला गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विद्युत दाब कमी प्रमाणात मिळत असल्याने गावातील पीठ गिरण्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते. ग्रामस्थांनी याबाबत महावितरण विभागाकडे वारंवार तक्रार केली, परंतु कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे यांचा गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महावितरण विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दि. १३ ऑगस्ट रोजी थेट पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे धाव घेऊन रीतसर तक्रार केली. ग्रामस्थांच्या तक्रारीची पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्वरित दखल घेऊन कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे यांची भ्रमणध्वनीवरून कानउघाडणी केली. विद्युत दाब वाढवून कारणे कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले.
------------
गावाला विद्युत दाब कमी मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून नवीन रोहित्राच्या मागणीसाठी संबंधितांना कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. परंतु, नवीन रोहित्र तर मिळालेच नाही, विद्युत दाब ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-गजानन बलक, सरपंच, सावरगाव.