अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय वाढविण्यात आले असून, त्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. मागील महिनाभरात चाचण्यांचे प्रमाण कमी- जास्त झाले असून, दररोजच पॉझिटिव्हिटी दर बदलत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले. शहरी भागासह ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून आले. मात्र, तुलनेने महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड चाचण्यांचे प्रमाण जास्त असले, तरी पॉझिटिव्ह अहवालांची संख्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये जास्त दिसून आली. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने मागील दोन ते तीन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढताना दिसून आली. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दरही बदलताना दिसून येत आहे.
ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण कमी
महापालिका क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुलनेने ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात आरटीपीसीआर चाचण्यांसह रॅपिड अँटिजन चाचण्यांसाठी शिबिरे घेण्यात येतात. शिबिरांमध्येच मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रामीण भागात आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड अँटिजन चाचण्या जास्त प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येते. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ग्रामीण भागात प्रभावी यंत्रणा नसल्याने रॅपिड चाचण्यांवर अधिक भर दिसून येतो.
आरटीपीसीआरच्या चाचण्या जास्त,
पॉझिटिव्हही जास्त
कोविडच्या निदानासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसह रॅपिड अँटिजन चाचण्याही केल्या जात आहेत. रॅपिड अँटिजन चाचण्यांच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये तुलनेने पाॅझिटिव्ह अहवालांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
कमी वेळेत निदान होत असल्याने बहुतांश व्यापारीवर्ग रॅपिड अँटिजन चाचणीला प्राधान्य देत आहेत. ज्यांना लक्षणे आहेत; मात्र रॅपिडचा अहवाल निगेटिव्ह आला, असे लोक आरटीपीसीआर चाचणी करून घेतात. यामध्ये अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. चाचण्या वाढविल्याने बाधित रुग्णांचे निदान करणे सहज शक्य झाले आहे. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, लक्षणे दिसताच तात्काळ चाचणी करून घ्यावी.
-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला
तारीख - चाचण्या - रुग्ण - पॉझिटिव्हिटी दर
१ एप्रिल - २,९४४ - २५८ - ११.४१
८ एप्रिल - ४,१८२ - २९८ - १४.०३
१५ एप्रिल - २,०४१ - ३३१- ६.१६
२१ एप्रिल - ४,१३२ - ७५४ - ५.४८
२८ एप्रिल - २,७८३ - ४०८ -६.८२
१ मे - ३,९३७ - ५६३ - ६.९९
२ मे - ३,५११ - ५९९ - ५.८६
३ मे - २,५०८ - ३८७ - ६.४८
४ मे - ४,११० - ७१८ - ५.७२
५ मे - ४,३६४ - ६९४ - ६.२८