‘स्क्रिन टाइम’ वाढल्याने मुलांमध्ये डोळ्यांच्या आजारात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:06 AM2020-11-09T11:06:32+5:302020-11-09T11:09:00+5:30
स्क्रिन टाइम वाढल्याने डोळ्यांशी निगडित विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत.
अकोला: कोराेनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. त्यामुळे मुलांचा स्क्रिन टाइम वाढला असून, मुलांमध्ये डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. मागील तीन ते चार महिन्यात जवळपास ३० ते ४० टक्के नेत्ररुग्णांमध्ये वाढले आहे. मागील सहा महिन्यात ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांमध्ये मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. तसेच घरीच लॅपटॉपवरून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. या दोन्ही घटकाचा स्क्रिन टाइम वाढल्याने डोळ्यांशी निगडित विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. विशेष करून मुलांमध्ये ‘मायोपिया’ या दृष्टिदोषाचे लक्षणे आढळून येत आहेत. यामध्ये रुग्णाला जवळचे दिसते, मात्र दूरचे दिसत नाही. लहान वयातच मुलांमध्ये नेत्र समस्या उद्भवू लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
काय आहे ‘मायोपिया’
मायोपिया एक दृष्टिदोष असून यामध्ये डोळ्यांच्या कार्यामध्ये दूरवरच्या वस्तूंमध्ये बदल दिसून येतात. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळे हा आजार होतो. मायोपिया असणाऱ्या प्रौढांमध्ये अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि रात्रीच्या वेळी वस्तू पाहण्यास अडचण यासारखी लक्षणे दिसून येतात तर मुले सतत डोळे मिचकावतात किंवा वारंवार डोळे चोळतात.
हे करा
- भरपूर पाणी प्यावे
- थंड पाण्याने डोळे धुवावेत
- एक ते दीड तासांनी ब्रेक घ्यावा
- फळांचा ज्युस घ्यावा
- ब्ल्यू कोट किंवा एआरसी ग्लासच्या चष्म्याचा वापर करावा
मोबाइल फोनचा वापर मर्यादित ठेवणे, व्यायाम करणे, डोळ्यांची वेळोवेळी तपासणी शिवाय, लुब्रिकंट ड्रॉपचा वापर करावा, इलेक्ट्रॉनिक साधनांवर काम करताना सलगपणे काम न करता अधूनमधून चक्कर मारावी, डोळ्यांची वारंवार उघडझाप करावी, धावणे, चालणे आणि योगा करणे फायदेशीर ठरू शकते.
- डॉ. गजानन भगत, नेत्रतज्ज्ञ,