अकोला : डाबकी रोडवरील गुलझारपुरा येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड मयूर निरंजन वेरुळकर यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलझारपुरा येथील रहिवासी मयूर निरंजन वेरुळकर वय २४ वर्ष हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे,जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले, डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय नाफडे, पंकज सूर्यवंशी, जावेद तडवी, दिनेश पवार, मतीन देशमुख, असद खान, ख्वाजा शेख यांनी केली.