घाणीच्या साम्राज्याने डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:15 AM2021-07-11T04:15:08+5:302021-07-11T04:15:08+5:30
------------------------------- रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत ...
-------------------------------
रेनकोटच्या विक्रीत झाली वाढ
पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे रेनकोटच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानात रेनकोट व छत्री विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून, तेथे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
---------------------
बँकांत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
तेल्हारा : शहरातील बँकांत निराधार, वयोवृद्ध, पेन्शनधारक, अपंग यांना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत स्वतंत्र सोय करावी, अशी मागणी आहे.
----------------------
जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी
तेल्हारा : पावसाळ्याच्या तोंडावर गेल्या वर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे मोठे आक्रमण होऊन जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यावर्षी जनावरांवर साथीच्या आजाराचे आक्रमण होऊ नये, यासाठी लसीकरण करावे, अशी मागणी आहे.
---------------------
गरिबांच्या घरातून गॅस झाला गायब
अकोट : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पैसा नाही. त्यातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने खेड्यातील सिलिंडर आता अडगळीत गेला आहे. खेड्यातील नागरिक जंगलातून सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.
---------------------------
वाडेगाव येथील पुलावर पडले खड्डे
वाडेगाव : वाडेगाव-अकोला मार्गावरील पुलाजवळ व पुलावर जागोजागी खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच या पुलाला संरक्षक कठडेही बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अपघाताचीही शक्यता आहे.
--------------------------
दिग्रस बु. परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित
दिग्रस बु. : पातूर तालुक्यात वीजसमस्या कायम आहे. दिग्रस बु. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात. त्यामुळे तक्रार करण्यासही जागा राहात नाही. यापूर्वी अनेकदा वीज वितरणकडे समस्यांबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे.
---------------------
घूसर परिसरात दमदार पाऊस
म्हातोडी : परिसरातील घूसर, घूसरवाडी, म्हातोडी, दोनवाडा आदी गावात शनिवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, ऊस आदी पिके पावसाअभावी सुकू लागली होती.
-----------------------------
अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी
बार्शीटाकळी : कोरोनाच्या नावाखाली पोलीस विभाग अवैध धंद्यावर आळा बसल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे मात्र सट्टा, दारू, जुगार जोमात सुरू आहे. याकडे पोलीस विभागांचे दुर्लक्ष असल्याने अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे.
------------------------------
म्हातोडी गावात अस्वच्छतेचा कहर
म्हातोडी : गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येते आहे. नाल्या तुंबल्या असून खताचे उघडे खड्डे वाहत्या कच्या नाल्या यामुळे त्रास वाढलेला आहे. फवारणी केली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
-----------------------
ग्रामीण भागात बसफेऱ्यांची वानवा
आगर : अकोला तालुक्यातील आगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
-------------------------
व्हायरल फिव्हरमुळे नागरिक हैराण
पिंजर : वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फिव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण असून दवाखान्यात दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदकामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.
---------------------
पातुरात पावसाने शेतकरी सुखावले
पातूर : तालुक्यातील शेतकरी पेरणी करून पावसाची वाट पाहत होते. अनेकांची पिके वर आल्यावर पाणी नसल्याने पीक वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आता दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले.
---------------------
ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी
बाळापूर : ग्रामीण भागात सर्रास विद्युत खांबावर आकोडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. या प्रकाराकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
---------------------------
भाजीपाल्याचे भाव वाढल्याने चिंता
तेल्हारा : काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तालुक्यातील गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. प्रत्येक भाजीवर किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींमध्ये चिंता आहे.
---------------
पूर्वीप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
चिखलगाव : अनलॉक झाल्यानंतरही तालुक्यातील बहुतांश गावात अद्यापही बस जात नाही. तेथील गावकऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारकही अव्वाच्या सव्वा दराने तिकीट वसूल करीत आहेत.
--------------------------
बाभूळगाव परिसरात पिकांना संजीवनी
पातूर : तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. मरसूळ शिवारात शेतकरी सोयाबीनच्या डवरणीला लागले आहेत. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. शेतशिवारात चहलपहल वाढली आहे.