मूर्तिजापूर येथे जखमी वानरास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:44+5:302021-02-06T04:32:44+5:30
मूर्तिजापूर : शहरातील एका हॉस्पिटलमागे गत दोन दिवसांपूर्वी एक गर्भवती वानर तिसऱ्या मजल्यावर पडल्याने तिला दुखापत झाली होती. ही ...
मूर्तिजापूर : शहरातील एका हॉस्पिटलमागे गत दोन दिवसांपूर्वी एक गर्भवती वानर तिसऱ्या मजल्यावर पडल्याने तिला दुखापत झाली होती. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाने सहायक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जावरकर यांना माहिती दिली. डॉ. जावरकर यांनी घटनास्थळ गाठून गर्भवती वानराच्या पोटातील पिलू काढले. पिलाचा पोटातच मृत्यू झाला होता. मृत पिलू बाहेर काढून माकडाला जीवदान दिल्याची घटना शुक्रवारी घडली. वानराला वनविभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी गर्भवती मादी वानर तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने पोटात दुखापत होऊन पिलाचा पोटातच मृत्यू झाला. तेव्हापासून जखमी मादी माकडाची हालचाल बंद झाली होती. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच या बाबत वनविभागाला सूचित करण्यात आले. वनविभागाने लगेच सहायक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. जावरकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच मादी वानरांच्या पोटातून डॉ. जावरकर यांनी मृत पिलू यशस्वीरीत्या बाहेर काढून तिचे प्राण वाचविले. औषधोपचार करून त्या वानराला वनविभागाच्या निगराणीत तुरखेड रोपवाटिकेत ठेवण्यात आले. सध्या ते सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनास्थळी वनरक्षक के. एस. बागवान, सर्पमित्र संजय दोड, अरुण सेंगर, गजानन नाकट, संगीत संगीले यांनी सहकार्य केले.
मादी वानर जखमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठून वानराला ताब्यात घेऊन डॉक्टराच्या मदतीने मृत पिलू बाहेर काढण्यात आले. सद्यस्थितीत मादी वानर सुखरूप असून, औषधोपचार सुरू आहे.
-के. एस. बागवान, वनरक्षक, मूर्तिजापूर.