इंझोरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामजागराचा वसा !
By Admin | Published: August 11, 2014 11:29 PM2014-08-11T23:29:39+5:302014-08-11T23:29:39+5:30
राष्ट्रसंतांनी घेतले होते तिन दिवस संमेलन : ७0 विद्यार्थ्यांचा सहभाग
वाशिम: जिल्ह्यातील मानोरा तालूक्याच्या कुशित वसलेल्या जवळपास ३६00 लोकसंख्येच्या इंझोरी गावातील ६0 ते ७0 विद्यार्थी गत १0 वर्षापासून राष्ट्रसंतांनी ग्रामगितेच्या माध्यमातून दाखविलेल्या ध्यान व प्रार्थनेचे नित्यनेमाने पठण करुन गावकर्यांमध्ये राष्ट्रभावना जागृतीचे काम करीत आहेत.
जगत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच इंझोरी गावात २0 ते २२ फेब्रुवारी १९४८ रोजी तीन दिवसाचे ग्राम प्रबोधन संमेलन घेतले होते हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श जपण्याचे काम आजही इंझोरीतील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंद्याने सहभागी करतात. इंझोरी गावातच उभारण्यात आलेल्या सामुदायीक प्रार्थना मंदिरात १0 वर्षापुर्वी गुरुदेव प्रार्थना व ध्यानसाधनेचा विषय सुरु झाला. ही ध्यानसाधना व राष्ट्रसंतांचे ग्रामविकासक विचार भावी पिढीच्या ध्यानीमनी रुजविण्यासाठी विद्यार्थीवर्गाने यात सहभागी होण्याचा विषय ग्रामपातळीवर पुढे आला. त्यातूनच गावातील जवळपास ६0 ते ७0 विद्यार्थ्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला अन् एक परंपरा सुरु झाली. ती परंपरा आजतागायत सुरु आहे. ६0 ते ७0 विद्यार्थी दरदिवशी या प्रार्थना व ध्यानसाधनेत सहभागी होत असल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी अरुण पाटील यांनी दिली. मानोरा तालूक्यातील गावागावात आजतागायत ग्रामगिता पठण वा प्रार्थनेचे काम केले जात नव्हते. परंतू या श्रावण महिण्यात मानोरा तालूक्यातील २१ गावात ग्रामगिता ग्रंथवाचन सुरु आहे. तालुक्यातील १९ गावातील घरभिंतीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले जाणार असून यापैकी ११ गावात भिंतीवरील सुविचार, उपदेशपर संदेशाचे काम पूर्णत्वास आल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक साहेबराव पाटील यांनी दिली.