वैधमापनशास्त्र विभागाकडून पेट्रोल पंपांची तपासणी
By admin | Published: June 1, 2017 02:07 AM2017-06-01T02:07:29+5:302017-06-01T02:07:29+5:30
मायक्रोचीप असल्याच्या संशयावरून केली चाचपणी
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर मायक्रोचीप बसवून ग्राहकांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आल्याने राज्यभरातील यंत्रणा हादरली आहे. त्यामुळे वैधमापनशास्त्र विभागाकडून अकोल्यातील पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात आली. शहरात कु ठे कमी प्रमाणात पेट्रोल तर दिले जात नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पेट्रोल पंपावर जाऊन निरीक्षकांनी पाहणी केली.
पेट्रोल पंपावरील मीटरमध्ये सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोलद्वारे हेराफेरी करून कोट्यवधींची लूट होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. पुणे आणि ठाणे येथील पेट्रोल पंपांवरील झाडाझडतीमध्ये मायक्रोचीप आढळून आल्याने राज्यभरात खळबळ माजली. पुणे-ठाण्याचे लोण अकोल्यात तर पोहोचले नाही ना, अशी शंका व्यक्त होत असल्याने ही चाचपणी करण्यात आली. अकोल्यातील काही पेट्रोल पंपांवर भरलेले पेट्रोल लगेच संपते, अशी तक्रार अनेक नागरिकांची अनेक दिवसांपासून आहे. पुणे-ठाण्यासारखी मायक्रोचीप यंत्रणा अकोल्यातील पेट्रोल पंप संचालकांनी तर बसविलेली नाही ना, अशी शंका समोर आल्याने ही तपासणी करण्यात आली.
‘लोकमत’ने अकोला पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ही शक्यता अकोल्यात नसल्याची बाजू ठेवली आहे; पण जर अकोलेकरांना संशय असेल, तर त्यांनी संबंधित पेट्रोल पंपाची तक्रार आॅइल कंपनी, पुरवठा विभाग किंवा संबंधित विभागाकडे रीतसर करावी. तसे असेल तर उजेडात येईल, असेही ते बोलले.
राज्यात अनेक ठिकाणी लावले सॉफ्टवेअर
महाराष्ट्रातील कारवाईत डोंबिवलीच्या विवेक शेटे आणि पिंपरी चिंचवडच्या अविनाश नाईक यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असे सॉफ्टवेअर या ठगांना बसवून दिले असून, त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची लूट होत असल्याचे उजेडात येत आहे.