सुपारी कशी ठरवते 'राजा'चे भविष्य; भेंडवळ मांडणीमागे काय आहे शास्त्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:59 AM2019-05-09T09:59:40+5:302019-05-09T15:28:05+5:30
भेंडवळ मांडणीद्वारे वर्तविण्यात येत असलेल्या भाकिताना कोणताही शास्त्रीय आधार नाही.
>> राजेश शेगोकार
अकबर बिरबलाच्या कथा या आजही दार्शनिक आहेत. एकदा बादशहाने एकदा बिरबलाला प्रश्न केला. २७ मधून ९ गेले तर किती उरतात...बिरबलाने चटकन उत्तर दिले शून्य. हे उत्तर ऐकून सर्वच आर्श्चयात पडले. मात्र बिरबल आपल्या उत्तरावर ठाम होता तो म्हणाला, २७ नक्षत्रांमधून पावसाचे ९ नक्षत्रे गेली तर हातात काय राहणार ? बिरबलाच्या उत्तराने सारेच अंतर्मुख झाले व हा तर्क साऱ्यांनाच पटला...ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे पावसाच्या या ९ नक्षत्रांची खात्री आजही देता येत नाही. त्यामुळेच एखादा पावसाचार्य किंवा भाकीत व्यक्त करणाऱ्या व्यवस्थेकडे साऱ्यांचे लक्ष लागते. भेंडवळची सुप्रसिद्ध मांडणी ही अशाच स्वरूपाची एक व्यवस्था आहे. ही मांडणी वैज्ञानिक कसोटीवर उतरते का? हवामानशास्त्राचे निकष या मांडणीत दिसतात का? ही मांडणी अंधश्रद्धा आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अशा ‘मांडणी’ चा भाकितांचा आधार घेत नवी आशा रूजविण्याचा प्रकार विदर्भात सर्वत्रच आहे.
खरंतर गेल्या तीन दशकांपासून शेती आणि शेतकरी हा विषय अतिशय गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे राहणारे ८० एकर शेतीचे मालक साहेबराव करपे यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आपली पत्नी व चारही अपत्यांसह १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली. ही आपल्या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला यावर्षी ३२ वर्ष पूर्ण झाले मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या या स्थितीला सुलतानी संकटासोबतच अस्मानी संकटही तितकेच कारणीभूत ठरले असून एकेकाळी नियमीत येणारा पाऊस लहरी झाल्याने शेतकऱ्यांचा जणु शत्रु क्रमांक एक झाला. त्यामुळे पावसाचे अंदाज देणाऱ्या कुठल्याही व्यवस्थेकडे शेतकरी आशने पाहतात. नेमकी हीच ‘आशा’ शेतकऱ्यांचा अनेकदा घात करते.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ हे आदीवासी बहूल जळगाव जामोद तालुक्यातील आडवळणाचे गाव, तसं पाहील तर नापिकी अन् कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या विदर्भातील इतर गावांप्रमाणेच हे गाव पण या गावात अक्षय तृतीयेला मोठी जत्रा भरते, ही जत्रा शेतकऱ्यांची असते, कुठलेही आमंत्रण नाही, कुठलाही नवस नाही, अंगारे धुपारे नाहीत त्यामुळे लौकीक अर्थाने अधंश्रद्धा म्हणावी असा कुठलाही प्रकार वरवर पाहता इथे होत नाही, तरीही हजारो शेतकरी इथे येतात कारण या ठिकाणी पुढील वर्षातील पिक पाण्याची स्थिती कशी राहील याचे भाकित वर्तविले जाते. विज्ञानाच्या मदतीने आपल्या प्रगतीचा अश्व वेगाने दौडत आहे मात्र अजूनही पावसाचा अचुक अंदाज देणारी व्यवस्था आपण निर्माण न झाल्याने शेतकऱ्यांसाठी अशी भाकिते अन् भविष्य आशावादी ठरतात त्यामुळे येथे गर्दी होते. पण आता या मांडणीच्या निष्कर्षावर ही साधक बाधक चर्चा होऊ लागली आहे. भेंडवळच्या मांडणीचे गेल्या काही वर्षातील निष्कर्ष हे खरे ठरले नाहीत कारण भेंडवळची भविष्यवाणी हा खरतर एक ठोकताळा आहे. दहा-पंधरा ठोकताळ्यांमधील चार- पाच खरे ठरतात अन् त्याची चर्चा अधिक होते. भेंडवळ येथील वाघ परिवार वंश परंपरेने हा वारसा अव्याहतपणे चालवत असून याच आधारावर शेतकरी मानसिक आधार शोधत आपापल्या पिकांचे नियोजन करीत असतात. या मांडणी करणाऱ्यांनी व्यक्तिश: कुणाला फसविले वा गंडविले नाही मात्र मांडणीत बाहेर आलेले निष्कर्ष हे मोघम शब्दातच असतात, हे निष्कर्ष हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र या सोबतच अगदी ज्योतिषशास्त्रालाही मान्य नाहीत. हे सत्य नाकारत येणार नाही. विदर्भात प्रख्यात असलेल्या सांडोळया, कुरडया, करंजी असे पदार्थ मांडणीमध्ये ठेवले जातात, सुपारी हे राज्याचे प्रतिक तर ढेकळं पर्जन्यमान सांगतात अशा पदार्थाच्या आधारावर पिक पाण्याचे या भाकिताला कुठलाही वैज्ञानिक आधारनाही. भेंडवळच्या मांडणीमागील कार्यकारणभाव व त्याची उपयुक्तता याचा मागोवा घेऊन या प्रकाराला पंरपरेच्या नव्हे तर विज्ञानाच्या कसोटीवर पारखण्याची गरज आहे. या मांडणीची विश्वसनीयता प्रकट करण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनीच या मांडणीच्या मागील निष्कर्षांचा मोगावा घेऊन मूल्यमापन करणे गरजेचे आहे.